भाजपच्या ‘चमकोगिरी’मुळे पुणेकरांचा जीव वेठीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 01:18 PM2021-12-04T13:18:38+5:302021-12-04T13:22:33+5:30
पुणे : महापालिका इमारतीच्या परिसरातील नव्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार आणि बेशिस्त वर्तनामुळे शुक्रवारी ...
पुणे : महापालिका इमारतीच्या परिसरातील नव्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार आणि बेशिस्त वर्तनामुळे शुक्रवारी (दि. ३) संध्याकाळी पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भाजपने विनापरवाना फ्लेक्सबाजीला ऊत आणून पुण्याच्या सौंदर्याचीही माती केली.
आधीच अवकाळी पाऊस आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतूक खोळंबा झाला होता. त्यातच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांसमोर चमकोगिरी करण्यासाठी रस्त्यावरच गर्दी जमवली. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जयंतराव टिळक पूल, डेंगळे पूल, नवा पूल, महर्षी शिंदे पूल तसेच महापालिका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. संध्याकाळच्या वेळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे अतोनात हाल झाले.
‘तुमचे कौतुक तुमच्याकडेच ठेवा’
नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार होते. त्यांच्यापुढे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी शहर भाजपने पुणेकरांना वेठीस धरले. यामुळे घरी परतणाऱ्या पुणेकरांची दैना उडाली. त्यामुळे ‘तुमचे कौतुक तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला शांतपणे घरी जाऊ द्यात’, या आशयाच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया पुणेकरांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केल्या. मात्र, त्याचे सोयरसूतक भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना नव्हते.
कोरोना नियमावलीचा फज्जा
महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने कोरोना आपत्ती आल्यापासून कोरोना संसर्ग टाळण्यासाठीचे ज्ञानाचे डोस पुणेकरांना सातत्याने पाजले आहेत. मात्र, कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातल्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी ना ‘मास्क’ घातले होते ना ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले. भाजपच्या बेशिस्तपणामुळे सर्वसामान्य पुणेकरांनाही गर्दीत, वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.
‘गर्दी जमविण्याचे आदेश’
प्रत्येक नगरसेवकाला २०० ते ३०० कार्यकर्ते आणण्याचा आदेशच शहर पातळीवरुन देण्यात आला होता, असे भाजप पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. महापालिकेच्या समोरच कार्यक्रमासाठी व्यासपीठ थाटण्यात आले होते. येथेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य प्रमुखांची भाषणे झाली. रस्त्यावर मांडलेल्या हजारो खुर्च्या, कार्यकर्त्यांची गर्दी, वाद्यांचा कर्कश्श गजर यामुळे महापालिका परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला.