आंबिल ओढा कारवाईला भाजपाच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:03+5:302021-06-30T04:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंबिल ओढा वसाहतीत गरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याला महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच जबाबदार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंबिल ओढा वसाहतीत गरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याला महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच जबाबदार आहे. कोरोना काळात झालेल्या या राक्षसी कारवाईची चौकशी सरकारला करायला लावू व दोषींना शासन करू, असा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला.
आंबिल ओढा वसाहतीला सोमवारी डॉ. राऊत यांनी भेट दिली व बाधित नागरिकांची विचारपूस केली. त्यानंतर काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना डॉ. राऊत यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर टीका केली. पालकमंत्र्यांचे नाव घेता, मीसुद्धा एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. माझ्याकडे महापालिका आहे. या संस्थांना स्वतःचे अधिकार आहेत. इतकी राक्षसी कारवाई होताना तिथे महापौरांसह पालिकेतील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता, याकडे डॉ. राऊत यांनी लक्ष वेधले.
कोरोना आपत्तीत हे गरीब कसेबसे जगतात. फुलांचे हार करून विकण्याचा त्यांचा व्यवसाय बंदच आहे. अशा वेळी बुलडोझर लावून, पाऊस पडत असतानाही त्यांची घरे पाडली. कारवाई होत असताना महिलांबरोबर अवमानकारक वर्तणूक केली. बिल्डरने जबरदस्ती करत धमक्या दिल्या. या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी, माजी आमदार दीप्ती चवधरी, महिला आघाडी अध्यक्ष सोनाली मारणे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
--//
डॉ. राऊत आढावा बैठक घेणार असे सांगण्यात येत होते. स्वागताच्या फ्लेक्सवरही तसेच लिहिले होते. प्रत्यक्षात मात्र डॉ. राऊत काँग्रेस भवनमध्ये आले व अवघ्या १० मिनिटांत निघूनही गेले. काही पदाधिकारी व कार्यकर्ते त्यामुळे नाराज झाले.
---------------------
महापालिकेनेच कारवाई केली, मग महापालिकाच चौकशी काय करणार? असे विचारले असता, डॉ. राऊत यांनी सरकार चौकशी करेल, असे सांगितले. तशी मागणी वरिष्ठांकडे करू. या सर्व प्रकाराची माहिती त्यांना देणार आहे. दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सर्व प्रयत्न करू, असे ते म्हणाले.