Video: पुण्यात भाजपचा रोड शो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 02:27 PM2023-02-24T14:27:00+5:302023-02-24T16:56:28+5:30
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी संपूर्ण ताकद झोकून दिल्याचे चित्र
पुणे : पुण्यात कसबा विधानसभा मतदार संघात भाजपच्या वतीने रोड शो काढण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि सर्व पदाधिकारी सहभागी झाले आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी संपूर्ण ताकद झोकून दिल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्तांतरानंतर थेट मतदारांचा कौल आजमावण्यासाठीची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे कोणतीही कसर सोडायची नाही, या निर्धाराने भाजपने प्रचार यंत्रणा आखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे प्रचारात सहभागी झाले आहेत.
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचे आयोजन केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण हे गेल्या १५ दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले, चित्रा वाघ यांनी रोड शोच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला, तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचे काम केले. विविध समाजांच्या मेळाव्याचेही आयोजन केले होते. विविध सामाजिक-धार्मिक संस्थांनी आपला पाठिंबा भाजपलाच असल्याचे जाहीर करून पक्षाला बळ दिले. यात हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था, महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ, छत्रपती शाहू महाराज बेरोजगार परिषद, पुणे शहर जय गणेश भवनामृत ब्राह्मण महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती, कासार विचार मंच इत्यादी संस्थांचा समावेश आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक प्रचारात थेट सहभागी न होऊ शकलेले खासदार गिरीश बापटही कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बापट यांनी बांधलेली यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरली आहे. बापट नियमितपणे माहिती घेत असून, प्रत्येक टप्प्यावर आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत, असे भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले.