भाजपने भाकरी फिरवली; राज्य कार्यकारिणीतून संजय काकडे, वर्षा तापकीर यांना वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 10:26 AM2023-05-04T10:26:12+5:302023-05-04T10:26:25+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर केली
पुणे : भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, त्यात भाकरी फिरविण्यात आली आहे. पुणे शहर भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना बढती देऊन प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले आहे. या आधीच्या कार्यकारिणीत राज्य उपाध्यक्ष असलेले माजी खासदार संजय काकडे आणि वर्षा तापकीर यांना नव्या कार्यकारिणीत वगळण्यात आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर केली. संजय भेगडे, अमर साबळे, राजेश पांडे यांची उपाध्यक्षपदी, तर वर्षा डहाळे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले आहे.
आधीच्या कार्यकारिणीत राज्य उपाध्यक्ष असलेले माजी खासदार संजय काकडे यांना उपाध्यक्षपदावरून पायउतार करून विशेष निमंत्रितांमध्ये संधी देण्यात आली आहे. तीन वेळा नगरसेविका राहिलेल्या वर्षा तापकीर याआधीच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी होत्या. त्यांनाही नव्या कार्यकारिणीत वगळण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर संधी हवी होती. मात्र, ती न मिळाल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्याचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते; पण तापकीर यांचे नाव यावेळी वगळण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दीपक मिसाळ, राजेंद्र शिळीमकर, जयंत भावे यांना विशेष निमंत्रितांमध्ये संधी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी, गणेश बीडकर, बापू पठारे, सुशील मेंगडे, अली दारूवाला, कुणाल टिळक, संजीवनी पांडे, उषा वाजपेयी, शरद ढमाले, सचिन पटवर्धन यांना निमंत्रितांमध्ये संधी देण्यात आली आहे.