BJP च्या चारशेपार नव्हे तीनशेच्या आतच जागा! महाराष्ट्रात समसमान जागा येतील
By श्रीकिशन काळे | Published: May 4, 2024 05:06 PM2024-05-04T17:06:58+5:302024-05-04T17:14:33+5:30
पवार म्हणाले, २०१४ आणि २०१९ ला प्रादेशिक पक्षांना मान्यता नव्हती. या निवडणूकीत स्थानिक पातळीवरच्या लीडरशीपला स्वत:ची प्रभाव क्षमता निर्माण केली आहे...
पुणे : ‘‘सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना समसमान म्हणजे २४-२४ जागा मिळतील. तर देशात भाजपला जवळपास २५० जागा मिळू शकतील, कारण उत्तरेकडे त्यांच्या विरोधी लाट असून, दक्षिणेकडे दिलासा देणारी लाट आहे. परिणामी भाजपची गाडी चारशे पार नव्हे तर तीनशेच्या आत अडकणार आहे, असा अंदाज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी सांगितला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.
पवार म्हणाले, २०१४ आणि २०१९ ला प्रादेशिक पक्षांना मान्यता नव्हती. या निवडणूकीत स्थानिक पातळीवरच्या लीडरशीपला स्वत:ची प्रभाव क्षमता निर्माण केली आहे. तेजस्वी यादव यांना आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक पातळीवरील लीडरशीप गेल्या दहा वर्षांत हतबल होती, ती आता मजबूत झाली आहे. त्याचे प्रमाण निवडणूकीनंतर कळेल.
लोक सांगत आहेत की, आम्हाला नेता कोण आहे, याचे काहीही देणे घेणे नाही. उमेदवार कोण हे देखील देणेघेणे नाही. पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने लोकं विचार करत आहेत. त्यावर देवाणघेवाण व चर्चा होत आहे. स्थानिक नेत्याची विश्वासाहर्ता लोकांमध्ये चालत आहे. लोकसभेला लोकांनी प्रमाण मानले नाही, ते विधानसभेनुसार चालत आहेत.
भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. आता देशात दोन टप्पे झालेत. राज्यानूहार आकडेवारी केली तर महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि राजस्थान या राज्यात समजा भाजपला फटका बसला तर १० टक्के म्हटले तर ४० जागा जातील. दिल्ली, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी मिळून १० जागा गेल्या तर एकूण ५० जागा कमी होतील. ३०३ मधून त्या कमी केल्या तर २५० पर्यंत त्यांच्या जागा होतील.
नेते बदलले तर...
नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याच्या बरोबर लोकं जातात का? तर इतर निवडणूकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. आता जनता नेत्याबरोबर फार कमी जात आहे. भाजपसोबत दोन मराठे चेहरे आहते. ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार. पण हे दोघे सोबत असले तरी राज्यातील सर्व जागा काही ते जिंकू शकत नाही. कारण नेते गेले तर जनता जायला तयार नाही. पण त्या नेत्यांसोबत काही लोकं नक्कीच जातील. एक नेता फुटला तर काही हजार मतदार फुटतात. त्या नेत्याकडे कोणती तरी सहकारी संस्था, कारखाना, शिक्षण संस्था असते. त्यातून काही हजार मते तिकडे जातात, असे पवार म्हणाले.
सध्या खुद्द पंतप्रधानांनी शिवसेनेबद्दलची भूमिका बदलली आहे. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल नरेंद्र मोदी चांगले बोलायला लागले आहेत किंवा ते त्यांना मदतीला घेतील. सरते शेवटी हिंदुत्वाची भावना एकच होती. त्यांचे मुद्दे समान होते. त्यामुळे ते पुढे एकत्र येतील का? असे वाटत आहे. संघाच्या लोकांबद्दल उध्दव ठाकरेंबद्दल प्रेम होते. या प्रेमाच्या पोटातून भविष्यात काय पॅटर्न घडेल हे आता सांगू शकत नाही.