मावळ, शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजप-शिंदे गटाचा होणार संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:40 AM2022-09-16T11:40:42+5:302022-09-16T11:41:29+5:30
शिंदे गटाला दोन जागा देणार?...
-विश्वास मोरे
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर व बारामती या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मावळ व शिरूर लोकसभेची जागा शिंदे गटास मिळाल्यास भाजपतून या मतदारसंघात इच्छुक असलेले आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांचे काय? अशी चर्चा व अस्वस्थता भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन जागांवरून दोन्ही गोटात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार नसलेल्या देशातील १४४ मतदारसंघांची यादी तयार केली आहे. महाराष्ट्रातील १६ आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे दिली आहे. या लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका सुरू केल्या आहेत. त्यामुळे संबंधित केंद्रीय मंत्री मतदारसंघात दौरा करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील विद्यमान व माजी खासदार यांच्यातही नाराजी आहे.
शिंदे गटाला दोन जागा देणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी घरोबा करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यातील शिवसेनेचे विद्यमान १२ खासदार आणि माजी खासदार शिंदे गटाबरोबर आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांचा समावेश आहे. शिरूरमधून भाजपकडून रिंगणात उतरण्यास आमदार महेश लांडगे आणि मावळमधून आमदार लक्ष्मण जगताप हे रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. दोन प्रबळ इच्छुक असताना दोन्ही जागा भाजपा शिंदे गटाला देणार की या गटाला भाजपत सामावून घेणार, याविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे.