पुण्यात भाजप-शिंदेसेना अन् राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र; आगामी निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता

By राजू इनामदार | Published: July 13, 2022 06:05 PM2022-07-13T18:05:23+5:302022-07-13T18:05:46+5:30

राज्यातील सत्तांतराने महापालिका निवडणुकीच्या आधीच्या गणितांवर माेठा परिणाम

BJP-Shindesena and NCP-Shiv Sena unite in Pune The upcoming election is likely to be multifaceted | पुण्यात भाजप-शिंदेसेना अन् राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र; आगामी निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता

पुण्यात भाजप-शिंदेसेना अन् राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र; आगामी निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप-शिंदेसेना यांची युती झाली तरी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष हे देखील स्वतंत्रपणे निवडणुकीला सामाेरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणूक बहुरंगी हाेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यातील सत्तांतराने महापालिका निवडणुकीच्या आधीच्या गणितांवर माेठा परिणाम झाला आहे. यापूर्वी महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे दिसत होते. याबाबत काँग्रेसची चालढकल सुरू होती, मात्र राज्यातील सत्तेत सहभागी झाले तसेच ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही होतील अशी चर्चा होती. परंतु राज्यात अनपेक्षितपणे राजकीय बंड हाेऊन सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीनही पक्षांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

केंद्रात आणि पुणे महापालिकेतही भाजपची सत्ता हाेती, मात्र राज्यात सत्ता मिळवलेल्या महाविकास आघाडीने एकत्रीत निवडणुकीला सामाेरे जात पुणे महापालिकेची सत्ता हातात घेण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने केली हाेती. राज्यातील सत्ता गेल्याने आघाडीचे गणित बिघडले. त्यामुळे हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेच्या विसर्जीत सभागृहात भाजपाचे एकहाती वर्चस्व होते. आरपीआयच्या आठवले गटाने त्यांनी निवडणूकीच्या आधीपासून साथ देत त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढवली होती. ९८ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत त्यामुळे भाजपाजवळ होते. त्यापेक्षाही जास्त नगरसेवक यावेळी निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांचे याआधी पुण्यात कोणीही समर्थक नव्हते. मात्र आता शिवसेनेतील माजी नगरसेवक, माजी शहरप्रमुख, युवा सेनेचे प्रद्श सहसचिव यांनी जाहीरपणे शिवसेनेतून निघून शिंदे गटाला जवळ केले आहे. त्यांना आणखी काहीजण मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर तेही भाजपाच्या साह्याने निवडणुकीत असतील.

याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तयारी चालवली आहे. दस्तुरखुद्द राज ठाकरेच पुण्याकडे लक्ष देत आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये असलेल्या २९ सदस्यांपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे असा चंगच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रसिद्धीच्या गराड्यात नसलेल्या आम आदमी पार्टीनेही रिक्षा, असंघटीत कामगार, कंत्राटी कामगार या क्षेत्रात संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यांनी आगामी महापालिका निवडणूक पुर्ण क्षमतेने लढणार असेच जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपा, शिंदे गट विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस, त्याशिवाय मनसे, आम आदमी पार्टी अशी बहुरंगी लढत महापालिकेच्या निवडणुकीत रंगेल असे दिसते आहे.

Web Title: BJP-Shindesena and NCP-Shiv Sena unite in Pune The upcoming election is likely to be multifaceted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.