भाजपा-शिवसेना युती संपुष्टात?
By admin | Published: December 30, 2016 04:42 AM2016-12-30T04:42:36+5:302016-12-30T04:42:36+5:30
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुचविले.
पिंपरी : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुचविले. तरीही भाजपाने स्वतंत्रपणे फ्लेक्सबाजी सुरू केली आहे. फ्लेक्सच्या माध्यमातून भाजपाने एकला चलोची भूमिका घेतल्याने भाजपा आणि शिवसेना युती संपुष्टात आली आहे, अशी चर्चा सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. महापालिकेतून राष्ट्रवादीची सत्ता उलथून लावण्याचा नारा भाजपाने दिला आहे. शहर पातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिकेत सत्ता येण्यासाठी युती आवश्यक आहे, अशी सूचना केल्याने खासदार अमर साबळे आणि शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेसमोर सर्वप्रथम युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहराध्यक्ष राहुल कलाटे, आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी चर्चाही झाली होती.
मात्र, दोन्ही पक्षांनी युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे सूचित केले होते. त्याचवेळी परस्पर विश्वास असावा, कोणत्याही अर्टी-शर्तीने युती होणार नाही, असे सूचित केले होते. निर्णय होईपर्यंत स्वबळाची तयारी करा, असेही दोन्ही पक्षांनी सूचित केले होते. (प्रतिनिधी)
जुन्या-नव्यांचा वादाचा अडथळा...
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपाची युती व्हावी, अशी भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांतून आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांमुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांतील श्रेयवादाच्या राजकारणामुळे युतीत अडचण येत असल्याची चर्चा शहरात आहे.
कार्यकर्ते अस्वस्थ
महापालिकेची आचारसंहिता जारी होण्यास आता काही दिवसांचा कालावधी उरला असताना युतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भाजपाकडे सुमारे पाचशे अर्ज आलेले आहेत, तर शिवसेनेनही
इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. युतीचा अधिकृत निर्णय झाला नसताना दुसरीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाजपाचे स्वतंत्रपणे फ्लेक्स झळकू लागले आहेत. त्यामुळे युतीची शक्यता मावळली असल्याचे दिसून येत आहे.