शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपा
By admin | Published: February 25, 2017 02:23 AM2017-02-25T02:23:10+5:302017-02-25T02:23:10+5:30
विधानसभा मतदारसंघाचा विचार करता, पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आहेत. यापूर्वी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी
मंगेश पांडे, पिंपरी
विधानसभा मतदारसंघाचा विचार करता, पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आहेत. यापूर्वी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे आमदार होते. असे असताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने मुसंडी मारली आहे. सात प्रभागांतील २८ जागांपैकी १२ जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. या मतदारसंघात शिवसेनेला अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात प्राधिकरण, आकुर्डी, शाहूनगर, खराळवाडी, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी हा परिसर येतो. महापालिकेचे सात प्रभाग या विधानसभा मतदारसंघात येतात. सात प्रभागांतील एकूण २८ जागांपैकी १२ जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने आणि ३ जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. गत महापालिका निवडणुकीत अवघ्या तीन जागा भाजपाला मिळाल्या होत्या. या निवडणुकीत केवळ पिंपरी विधानसभा मतदारसंघात चारपट अधिक जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. आझम पानसरे यांना भाजपात घेतले. हे पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपाच्या पथ्यावर पडले आहे. चिंचवड मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्राबल्य आहे. भोसरीत आमदार महेश लांडगे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपाच्या दृष्टीने पिंपरी विधानसभा महत्त्वाचा होता. तेथे प्राबल्य असलेल्या आझम पानसरे यांच्या भाजपा प्रवेशाने पिंपरीतील उणीवसुद्धा भरून निघाली. तिन्ही मतदार संघात त्या त्या शिलेदाराने खिंड लढविल्याने भाजपाला हे यश संपादन करणे सुलभ झाले. पारंपरिक कट्टर शत्रुत्व असलेल्या आमदार जगताप आणि आझम पानसरे यांना एकत्रित आणण्याची भाजपाची खेळी यशस्वी ठरली. राष्ट्रवादीची बलस्थाने आपल्याकडे वळविण्याची किमया भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदारांनी यशस्वी करून दाखवली.