भाजपला पुण्यात धक्का; वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारेंचा शरद पवार गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:13 PM2024-09-19T15:13:54+5:302024-09-19T15:14:26+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी बापूसाहेब पठारे इच्छुक असून त्यांची उमेदवारी या प्रवेशानंतर जवळपास निश्चित मानली जात आहे
चंदननगर : कागलमधील भाजपचे समरजित घाडगे यांच्यानंतर पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपमधील माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना शरद पवार यांनी पक्षात प्रवेश देऊन भाजपला शहरात धक्का दिला आहे. महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बापूसाहेब पठारे इच्छुक असून त्यांची उमेदवारी या प्रवेशानंतर जवळपास निश्चित मानली जात आहे.
माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (पवार गट) प्रवेश केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पठारे यांचा पक्षप्रवेश पार पडला. पठारेंसह त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, पुतण्या मा. नगरसेवक महेंद्र पठारे, मा. नगरसेवक महादेव पठारे, भय्यासाहेब जाधव, अशिष माने, शैलेश राजगुरू यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. कारण गेल्या आठ दिवसांपूर्वी बापूसाहेब पठारे यांनी खराडी चंदननगर वडगावशेरी भागातील गणपती मंडळांना भेट देताना आपण तुतारीकडून लढणार, असे जाहीर करून शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्यांनी प्रवेश केला. बापूसाहेब पठारे हे विधानसभा मतदारसंघाच्या नव्या रचनेनुसार वडगावशेरी मतदारसंघाची २००९ रोजी रचना झाली त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्याप्रमाणे ते २०१४ ला ही घड्याळ चिन्हावर लढले. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ रोजी ऐन विधानसभेच्या तोंडावर पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला होता. मात्र, आज पुन्हा बापूसाहेब पठारे हे स्वगृही परतले.
महायुतीत वडगाव शेरीची जागा अजित पवार यांच्याकडे आहे, तर आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास बापू पठारे इच्छुक आहेत; परंतु महायुतीत हा मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे तेथे विद्यमान आमदार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी लढविणार आहे. ज्याचा जिथे विद्यमान आमदार, त्याला तिथे तिकीट असे महायुतीचे सूत्र ठरले असल्याने भाजपमध्ये राहिलो तर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, हे निश्चित होताच बापू पठारे यांनी बाजू पलटली.