भाजपाने पुणेकरांची माफी मागावी
By admin | Published: April 27, 2017 05:12 AM2017-04-27T05:12:46+5:302017-04-27T05:12:46+5:30
स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी महापालिकेत घातलेल्या धुडगूस व तोडफोडप्रकरणी भारतीय जनता पक्षाने महात्मा फुले यांच्या
पुणे : स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी महापालिकेत घातलेल्या धुडगूस व तोडफोडप्रकरणी भारतीय जनता पक्षाने महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ येऊन पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. भाजपाच्या गुंडाराजचा धिक्कार करीत पक्षाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करीत धरणे धरण्यात आली.
शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, पक्षाचे सर्व नगरसेवक तसेच विविध आघाड्यांचे प्रमुख, शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चव्हाण म्हणाल्या की, कोणत्याही राजकीय पक्षाने महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत असा धुडगूस घातला नव्हता. पोलिसांनी पंचनामा केला, त्यात साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले व हे नुकसान करणाऱ्यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला व महापौरांनीही तो स्वीकारला ही अत्यंत खेदाची बाब आहे. हीच पद्धत पडली तर उद्या त्यांच्याच पक्षाचे आणखी कोणी गुंड अॅडव्हान्समध्ये पैसे जमा करतील व तोडफोड करतील. त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी.
वैशाली बनकर , चंचला कोद्रे, रूपाली चाकणकर लक्ष्मी दुधाने, दत्तात्रय धनकवडे , महेंद्र पठारे, रवींद्र माळवदकर, अशोक राठी, स्मिता कोंढरे, मनाली भिलारे , राकेश कामठे , विपुल म्हैसुरकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
ज्यांनी नुकसानभरपाईचा धनादेश दिला, त्यांनी नुकसान केल्याचेच कबूल केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच भाजपाने महापालिकेत महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर येऊन पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
(प्रतिनिधी)