Ramdas Athawale: पुणे महापालिकेत भाजपने रिपाईला महापौरपद द्यावे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:58 PM2021-12-27T17:58:37+5:302021-12-27T17:59:06+5:30
पुणे शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती
पुणे : पुणे शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले. त्याबरोबरच राज्यपाल, महाविकास आघाडी, अशा विविध मुद्द्यांवर लक्षकेंद्रित केले. यावेळी पुणे महापालिकेचे महापौर पद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्यावे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
''मुंबईतही भाजप-रिपाइं एकत्रित येऊन उपमहापौर पद रिपाइंला मिळेल. अन्य महानगरपालिका व जिल्हा परिषद यामध्येही आम्ही भाजपसोबत आहोत आणि सत्ता मिळवू. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत राहील. सध्या पुणे महापालिकेत रिपाइंचे पाच नगरसेवक आहेत. मागच्या वेळी १३ जागा दिल्या होत्या. यावेळी १५-१६ जागा द्याव्यात. आरक्षण पडले, तर महापौर पद द्यावे. असे आठवले म्हणाले आहेत.
पाच राज्यांत यश मिळेल
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत आहे. या राज्यात रिपाइंला मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे भाजपाला फायदा होईल. भाजपने रिपाइंला प्रत्येक राज्यात काही जागा द्याव्यात. जागा देणे शक्य नसेल, तर सत्तेत वाटा मिळावा, अशी चर्चा करणार आहे. अखिलेश यादव यांचा प्रयत्न सुरु असला, तरी सत्ता मिळणे अवघड आहे. तेथील गुंडशाही संपुष्टात आणून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचा भाव कमी केला आहे. कृषी कायदे मागे घेतले आहेत. पुन्हा सरकार कायदे आणणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, हे चुकीचे आहे. पाचही राज्यात भाजपची सत्ता येईल.
राज्यपालांच्या अधिकारांत ढवळाढवळ नको
राज्यपाल सक्रिय आहेत. त्यांचा अधिकाराचा चांगला वापर करत आहेत. गैरवापर करतात असे म्हणणे चुकीचे. याउलट राज्य सरकारकडून राज्यपालांच्या अधिकारात ढवळाढवळ सुरु आहे. ती थांबायला हवी. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली असली, तरी हे सरकार घालवणे गरजेचे आहे.