राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने थोपटले दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:29+5:302021-09-24T04:13:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील राजकीय घडामोडींना वेग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेत राष्ट्रवादीने शनिवारी ‘सोमेश्वर विकास पॅनेल’ नावाने निवडणूक लढवत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपने देखील राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
सर्वसामान्य सभासदांची सत्ता कारखान्यावर आणण्यासाठी ‘सोमेश्वर परिवर्तन पॅनेल’ लढाईत उतरत आहे, असे प्रतिपादन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी केले. एकीकडे सोमेश्वर कारखान्याच्या व्यवस्थापनात काही ठेकेदारांचं वर्चस्व निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे कारखान्याचे नेतृत्व खासगीकरणाचे पुरस्कर्ते आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक खासगी कारखान्यांचे भले व्हावे अशा पद्धतीने निर्णय घेतले जातात. हे बदलून सर्वसामान्य सभासदाची सत्ता कारखान्यावर आणण्यासाठी ‘सोमेश्वर परिवर्तन पॅनेल’ लढाईत उतरत असल्याचा टोला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना लगावला आहे. यावेळी ‘सोमेश्वर’चे माजी संचालक पी. के. जगताप, बाळासाहेब भोसले, इंद्रजित भोसले, बबलू सकुंडे, नाना गायकवाड आदी उपस्थित होते.
खैरे म्हणाले, ‘सोमेश्वर’ने खासगी कारखान्यांना ऊस पळविता यावा म्हणून विस्तारीकरण जाणीवपूर्वक लांबविण्यात आले. तीन वर्षे शेतकऱ्यांना नाईलाजाने अन्य कारखान्यांना ऊस द्यावा लागला. त्यामुळे सोमेश्वरच्या तुलनेत त्यांना कमी भाव मिळाला. जवळपास २४ कोटी रुपयांचे सभासदांचे नुकसान झाले आहे. शिवाय छत्रपती, माळेगाव व सोमेश्वर हे तिन्ही कारखाने एकाच नेतृत्वाखाली गेल्यामुळे भावाची स्पर्धा संपली आहे. खासगी कारखान्यांचे भावाचे अपयश झाकण्यासाठी व शेजारच्या कारखान्याला सांभाळून घेण्यासाठी सोमेश्वरची परिस्थिती चांगली असतानाही सभासदांना भावात दोनशे-तीनशे रुपये कमी दिले जातात. हा कारभार निवडणुकीत उघड करणार आहे. गुजरातच्या धर्तीवर सर्वोत्तम भाव कसा देता येतो हे दाखवून देण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहोत.
पी. के. जगताप म्हणाले की, सत्ताधारी चांगल्या भावाबद्दल पाठ थोपटून घेत असले, तरी मोदीसरकारचे इथेनॉलचे धोरण आणि साखरेला बांधून दिलेला भाव याचेही मोठे योगदान आहे. तसेच, भावात पैसे कसे मारले जातात आणि कंत्राटदारांना कसे जास्त दिले जातात हे पुराव्यानिशी मांडणार आहे, असे जगताप यांनी मत मांडले.