पुण्यात भाजपची रणनीती; कसबा - पिंपरी चिंचवडची जबाबदारी 'या' पदाधिकाऱ्यांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 03:28 PM2023-02-08T15:28:39+5:302023-02-08T15:29:16+5:30
कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप, महाविकास आघडीसहित इतर पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. कसब्यात भाजपचे तब्बल ४० वर्षांचे वर्चस्व कमी करण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे आता भाजपने निवडणुकांची रणनीती आखली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची जबाबदारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार माधुरी मिसाळ निवडणूक प्रमुख म्हणून म्हणून काम पाहणार आहेत. तर धीरज घाटे यांच्याकडे निवडणूक सहप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.
पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक लढवण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. परंतु ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील होते. भाजपचे हेमंत रासने आणि अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीकडे विनंती केली होती. परंतु दोन्हीकडे आघाडी ठाम राहिली.
काँग्रेस भवनात बैठक सुरु
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कोपरा सभा व प्रचाराशी संबंधित अन्य कामांसाठीही समित्या स्थापन केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचाराला विरोधी पक्षनेते अजित पवार, तसेच काँग्रेस, शिवसेनेच्या अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तांबडी जोगेश्वरी मंदिरात पूजा करून सुरुवात करण्यात येणार आहे. त्याची वेळ निश्चित करण्यात येईल. प्रचारासाठी तिन्ही पक्षांचे राज्यस्तरावरील कोणते नेते येऊ शकतील, त्यांचे नावे तयार केली जात आहेत. त्यांच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या प्रचार सभा मतदारसंघात आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक सुरु झाली आहेत.