'मिशन बारामती’ साठी भाजपच्या जोरदार हालचाली; 2 महिन्यांतच निर्मला सीतारामन यांचा दुसरा दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:51 PM2022-11-08T17:51:23+5:302022-11-08T17:51:41+5:30
यंदा सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामती मुक्कामी येणार
बारामती : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप ने गांभीर्याने घेतल्याचे संकेत आहेत. भाजपच्या मिशन ‘बारामती लोकसभा’ जोरदार हालचाली आतापासुनच तयारी सुरु केली आहे. सप्टेंबरनंतर अवघ्या दोन महिन्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुसऱ्यांदा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. यंदा सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामती मुक्कामी येणार आहेत.
याबाबत भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी ‘लोकमत‘शी बोलताना माहिती दिली.
मोटे म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबरच्या अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दुसरा दौरा आयोजित केला आहे. त्याची पुर्वतयारी आतापासुनच सुुरु केली आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामतीत ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी मुक्कामी दौऱ्यावर येणार आहेत. ११ तारखेला खडकवासला, भोर, पुरंदर, जेजुरीवरुन पटेल हे बारामती येथे येणार आहेत. यावेळी पटेल यांच्यासमवेत आमदार राम शिंदे, गणेश भेगडे, वासुदेव काळे आदी उपस्थित राहणार आहेत.
पटेल हे येथील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादीचे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात असलेल्या शेतकरी कृती समितीच्या प्रमुखांना भेटणार आहेत. यामध्ये पटेल सहकारतज्ञ चंद्रराव तावरे यांच्या सांगवी येथील निवासस्थानी मुक्कामी येणार आहेत. याचवेळी ते राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माळेगांवचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, सतीश काकडे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर पटेल हे १२ नोव्हेंबर रोजी इंदापुर, भिगवण, दौंड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर कौन्सिल हॉल पुणे येथे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.