कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 05:16 PM2023-02-12T17:16:41+5:302023-02-12T17:16:58+5:30
भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता
पुणे : भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून महाराष्ट्राची बदनामी करुन घेतली आणि कोश्यारींनी संपूर्ण कार्यकाळात पक्षपातीपणा केला. कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली आहेत त्याची फळे भाजपला भोगावीच लागतील अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पुण्यात ते बोलत होते. राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सगळ्या विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत त्यात नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल कसे असू नयेत याचे उत्तम उदाहरण आहेत. राजभवनात बसून त्यांनी केलेले राजकारण राज्यातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता. स्वत:ला महाशक्ती समजणारं नरेंद्र मोदींचं सरकार यांनी महापुरुषांना बदनाम करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा विरोध महाराष्ट्राच्या जनतेने केला त्याचप्रमाणे आता भाजपला खाली उतरवायचं असेल आणि महागाई कमी करायची असेल तर भाजपला सत्तेतून काढावं लागणार आहे, अशी भावना जनतेच्या मनात रुजवणं गरजेचं असल्याचं नाना पटोले यांनी सांगितले.
राजीनामा स्वीकारायला फार उशीर झाला- सुप्रिया सुळे
भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यासाठी फार उशीर केला आहे. त्यांना कधीच या पदावरुन हटवण्यात यायला हवं होतं. राज्यपालांनी नेहमी महापुरुषांचा अपमान केला. त्यामुळे त्यांना या पदावरुन फार पूर्वीच हटवण्यात यायला हवं होतं. भाजप सरकारकडून अनेक दिवसांनी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा रोष आणि विरोधीपक्षाने मांडलेली भूमिकेमुळे भाजपला राजीनामा मंजूर करावा लागला. कोश्यारींना आम्ही कायम मान दिला. राज्यपाल पदावर बसणाऱ्या माणसाने संविधानाच्या चौकटीत राहून काम करावं.मात्र त्यांनी त्या उलट केलं. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान सातत्याने केला. त्यामुळे भाजपच्या निर्णयाचं स्वागत आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.