ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याबाबत भाजपची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:49+5:302021-09-22T04:13:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारी भाजपने माघार घेतली. या ...

BJP withdraws on amenity space lease | ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याबाबत भाजपची माघार

ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याबाबत भाजपची माघार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारी भाजपने माघार घेतली. या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केल्यानंतर बुधवारी मुख्य सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी न आणण्याचा निर्णय आता भाजपने घेतला आहे. याबाबत घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांस, सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी महापौर म्हणाले, या सर्व ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देऊन त्या माध्यमातून जवळपास १ हजार ७०० कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. या निधीतून अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागू शकणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक ॲमेनिटी स्पेस विकायला काढल्या आहेत, असे आरोप करून पुणेकरांमध्ये गैरसमज निर्माण केला. एकीकडे एमएमआरडीए, पीएमआरडीए, सिडको याठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या ताब्यामधील संस्थांमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात मात्र भाजपची सत्ता असल्याने चुकीचे आरोप करून गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांसह सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेणार आहोत. बुधवारी मुख्य सभेत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करणार नसल्याचे महापौरांनी जाहीर केले. तसेच ॲमेनिटी भाडेतत्त्वावर देण्यावर आम्ही ठाम असल्याचेही महापौर यांनी यावेळी स्पष्ट केले.

------------------------

पुणेकरांचा विरोध यशस्वी झाला

महापालिकेच्या ताब्यातील ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या निर्णयाला पुणेकरांनी प्रचंड विरोध केल्यानेच सत्ताधाऱ्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. महापालिकेची मालकी असलेल्या आणि पुणेकरांच्या हक्काच्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला लगावलेली जोरदार चपराक आहे. विघ्नहर्त्या गजाननाने भाजपला उशिरा का होईना सद्बुद्धी दिली असून, त्यामुळे पुणेकरांवर भाजपमुळे येऊ घातलेले एक विघ्न टळले आहे.

- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Web Title: BJP withdraws on amenity space lease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.