राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भांडणात भाजप चा फायदा? खेड पंचायत समिती मध्ये अविश्वास ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 02:19 PM2021-05-31T14:19:22+5:302021-05-31T14:21:35+5:30
सेनेचा सदस्यांचा बंडखोरी ला राष्ट्रवादी आणि भाजप ची साथ रिसॉर्ट पॉलिटिक्स पर्यंत गेला होता वाद.
राजगुरुनगर: खेड मध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता आणखी वेगळे वळण लागले आहे.इथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा भांडणात भाजप चा फायदा होईल अशी चिन्हं निर्माण झाली आहेत.पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरुध्द दाखल केेलेला अविश्वास ठराव आकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता भाजप चे उपसभापती सभापती पदी नेमले जाऊ शकतात.
२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता . त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली . या ठरावावर आज पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागिय अधिकारी विक्रांत चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली . यावेळी त्यांनी सभागृहात अविश्वास ठराव मांडला . यावर आजी माजी सभापती, उपसभापती व सदस्यांनी मते मांडली . हात वर करून मतदान घेण्यात आले . ठरावाच्या बाजून ११ जणांनीं हात वर केले . भगवान पोखरकर, अमोल पवार, ज्योती आरगडे यांनी ठरावाच्या विरोधी मतदान केले .
शिवसेनेच्या सुनिता सांडभोर, वैशाली जाधव , सुभद्रा शिंदे, मच्छिंद्र गावडे, अमर कांबळे, अंकुश राक्षे आणि राष्ट्रवादी चे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे, व भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा असल्याने कलम १४४ (संचारबंदी) लागू करण्यात आले होते. त्यामुळे शहरात पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होते. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने दि २४ मे रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. व सदस्य राजकीय सहलीसाठी गेले होते. डोणजे येथील एका रिसोर्ट मध्ये पंचायत समिती सदस्य मुक्कामी असलेल्या ठिकाणी सभापती पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन धिंगाणा घातला होता. या घटनेबाबत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलिप मोहिते पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्याआरोपांची खैरात झाली होती. गेल्या दोन दिवसापासुन खेड समिती पंचायत इमारतीसमोर पोलिसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अविश्वास ठरावासाठी प्रांत यांनी सकाळी ११ वाजता विशेष सभा पंचायत समिती सभागृहात बोलविली होती.तसेच सभापती भगवान पोखरकर यांना सभेत भाग घेण्यासाठी न्यायालयीन परवानगी मिळाली असल्याने पोलिस बंदोबस्तामध्ये त्यांना राजगुरूनगर येथे आणण्यात आले.