लॉकडाऊनच्या विरोधात भाजपचे सविनय कायदेभंग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:50+5:302021-04-08T04:11:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाच्या आदेशापेक्षा वेगळा लॉकडाऊन पुणे शहरात लावल्याने व्यापारी, छोटे व्यावसायिक व हातावर पोट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाच्या आदेशापेक्षा वेगळा लॉकडाऊन पुणे शहरात लावल्याने व्यापारी, छोटे व्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांवर अन्याय होत आहे. याचा निषेध करीत बुधवारी भाजपच्या व्यापारी आघाडीच्यावतीने बिबवेवाडी येथील दुकाने उघडून ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन करण्यात आले़
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस गणेश घोष, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, नगरसेवक प्रवीण चोरबेले उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, शहरातील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था बिकट होणार असून सर्वसामान्यांना रोजची भाकरी मिळणे ही अवघड होणार आहे. सरकार पुण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेत असली तरी त्यात एकवाक्यता नाही. पुण्यातील सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहराची अर्थव्यवस्था कोलमडणार असून नागरिकांची गैरसोय होणार आहे. मात्र या निर्णयामुळे हप्तेवसुली सुरू होण्याची भीती आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे राज्यात लॉकडाऊन आहे, त्याच नियमांवर आधारीत शहरात लॉकडाउन सुरू करावे व सर्व प्रकारच्या दुकानांना परवानगी द्यावी़ तसेच संचारबंदी रात्री ८ नंतर लागू करावी आणि पीएमपीची बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले़
आमदार मिसाळ यांनी, राज्य शासनाने ब्रेक द चेनचा आदेश काढला असला तरी त्यातून पुण्याला वगळले असून, शहरात अधिक कठोर निर्बंध लावल्याने हा एकप्रकारे संपूर्ण लॉकडाऊनच असल्याचे सांगितले. गेल्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते़ आता कुठे ते या परिस्थितीतून बाहेर येत होते, पण नवीन नियमांमुळे त्यांच्यावर आणि त्यांच्यावर अवलंबून असणा-या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होणार आहेत. शहरात राज्याप्रमाणे नियमावली जाहीर करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले़
---
फोटो - बिबवेवाडी येथील दुकाने उघडून भाजपच्या व्यापारी आघाडीच्यावतीने ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन करण्यात आले़