भाजपाची दुटप्पी भूमिका

By admin | Published: August 9, 2016 01:39 AM2016-08-09T01:39:36+5:302016-08-09T01:39:36+5:30

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात एक, अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे.

BJP's double role | भाजपाची दुटप्पी भूमिका

भाजपाची दुटप्पी भूमिका

Next

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात एक, अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, जलवाहिनी पूर्णत: रद्द करणे आदींविषयी केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. विरोधात असणारी भाजपा सत्तेत आली, तरी मावळवासीयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पाण्यासाठी झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केल्याने तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अजूनही न्याय मिळालेला नाही.

मतांच्या राजकारणासाठी मावळ आणि पिंपरी-चिंचवडवासीयांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. मावळवासीयांच्या हृदयावरील भळभळती जखम गेल्या पाच वर्षांपासून तशीच आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली. या वेळी बंदिस्त वाहिनीतून पाणी नेऊ नये, अशी मागणी मावळवासीयांची होती. बंदिस्त वाहिनीतून पाणी नेले, तर शेतीला पाणी मिळणार नसल्याची भावना मावळवासीयांची झाली. आणि त्यातच तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ‘असे अनेक विरोध आम्ही मोडून काढले आहेत’ असे विधान केल्याने या विषयाला वेगळे वळण मिळाले.
राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा आणि इतर पक्ष असे वातावरण तयार झाले. याच ठिकाणी राष्ट्रवादीचा फाजील आत्मविश्वास अंगलट आला. मावळातील शेतकऱ्यांनी जलवाहिनीविरोधात आंदोलन सुरू केले. याचा शेवट बऊर येथील गोळीबाराने झाला. त्यात तीन शेतकरी शहीद झाले. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलवाहिनीच्या कामास स्थगिती दिली. या घटनेनंतर शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. अटकसत्रही सुरू झाले. चौकशी समिती नेमली गेली. गोळीबारास कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. त्यानंतर २०१४ च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे रद्द करू, असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी दिले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. दोन वर्षे झाली, तरी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. शेतकऱ्यांना तारीख पे तारीख मिळत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's double role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.