गाफील काँग्रेसवर भाजपाचा डाव
By admin | Published: February 25, 2017 02:43 AM2017-02-25T02:43:10+5:302017-02-25T02:43:10+5:30
प्रभाग क्रमांक १९ मधील ब आणि क या दोन जागांवरचा भाजपाच्या महिला उमेदवारांचा विजय काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
राजू इनामदार , पुणे
पुणे : प्रभाग क्रमांक १९ मधील ब आणि क या दोन जागांवरचा भाजपाच्या महिला उमेदवारांचा विजय काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. सगळी मते आपलीच, पूर्ण पॅनेल येणार या समजुतीत असणाऱ्या दोन्ही काँग्रेसला मतदारांनी दोन वेगळे व तेही भाजपाचे चेहरे देऊन चांगला धडा शिकविला आहे. तुम्ही सांगाल ते होणार नाही, आम्हाला वाटेल तेच होईल, असेच दोन काँग्रेस व दोन भाजपा असा निकाल देऊन मतदारांनी काँग्रेस व राष्ट्रवादीलाही बजावले.
झालेले मतदान पाहिले तर मतदारांनी किती चाणाक्षपणे निर्णय दिला हे लक्षात येते. अ गटात काँग्रेसच्या अविनाश बागवे यांना १४ हजार ५७८ मते मिळाली व ते विजयी झाले. ब गटात विजयी झालेल्या भाजपाच्या मनीषा लडकत यांना १२ हजार ९३४ मते मिळाली. क गटातील भाजपाच्याच अर्चना पाटील यांच्या पारड्यात १० हजार ४१८ मते पडली. ड गटात काँग्रेसचे रफिक अब्दूल शेख ८ हजार ९३८ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका हिना मोमिन या ब गटात उमेदवार होत्या. बागवे व रफिक अब्दूल शेख यांच्या जोडीने काँग्रेसच्याच महिला उमेदवार येणे अपेक्षित होते. पण मतदारांनी प्रत्यक्षात त्यांना नाकारले व भाजपाच्या दोन महिला उमेदवारांना संधी दिली. या भागातून पालिकेसाठी भाजपाचे उमेदवार निवडून येतील यावर भाजपाचाही विश्वास नसेल, पण मतदारांनी हे क्रॉस व्होटिंग विचारपूर्वक झालेले आहे, असेच काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांमधील विरोधाभास पाहता म्हणावे लागेल. कारण राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका हिना मोमिन व त्यांच्या अन्य तीन उमेदवारांना मतदारांनी विचारातही घेतलेले नाही, असे त्यांच्या मतांच्या संख्येवरून दिसते.