Devendra Fadanvis: CM पुत्राच्या मतदारसंघात भाजपचं 'कल्याण', फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 09:00 PM2022-09-07T21:00:57+5:302022-09-07T21:35:41+5:30
कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजपचे नियोजन सुरू झाले आहे
पुणे - राज्यात मागील काही दिवसांपासून भाजपानं 'मिशन महाराष्ट्र' हाती घेतले आहे. त्यात शतप्रतिशत भाजपा कार्यक्रम राबवला जाणार आहे. देशातील १४० मतदारसंघात केंद्रीय नेतृत्वानं विशेष लक्ष देण्याची जबाबदारी मंत्र्यांवर टाकली आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये, शरद पवारांचा बारामती टार्गेटवर आहे. तर, याच १६ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे लोकप्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र, आता कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजपचे नियोजन सुरू झाले आहे. येत्या रविवारपासून माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा ३ दिवसीय कल्याण लोकसभा दौरा आयोजित करण्यात आला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १६ मतदारसंघात लक्ष केंद्रित केलं आहे या १६ मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र, नुकतेच भाजपने शिंदे गटासोबत संसार थाटला आहे. तरीही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपुत्राच्याच मतदारसंघात भाजपने लक्ष्य केल्यामुळे चर्चेला उधाण आले. त्यावर, आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांच्या जागांवर आम्ही का दावा करू? असा सवाल करत फडणवीसांनी कल्याणमधील लोकसभा सीटवर कुठलाही दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. त्यामुळे उर्वरित शिवसेनेच्या जागांबाबतचा निर्णय शिंदे आणि भाजपा एकत्र घेईल, असेही त्यांनी सांगितले.
कल्याण मतदारसंघावर भाजपा दावा करणार?
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत असे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाचे प्रभारी संजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत येत्या ११ ,१२,१३ तारखेला म्हणजेच रविवारी ,सोमवारी ,मंगळवारी माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असल्याचे सांगितले.