चिंचवडला भाजपचा जोर; लक्ष्मण जगताप बाजीगर

By admin | Published: October 19, 2014 11:53 PM2014-10-19T23:53:32+5:302014-10-19T23:53:32+5:30

चिंचवड विधानसभा निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा दणदणीत विजय झाला

BJP's push for Chinchwad; Laxman jagatap jamgir | चिंचवडला भाजपचा जोर; लक्ष्मण जगताप बाजीगर

चिंचवडला भाजपचा जोर; लक्ष्मण जगताप बाजीगर

Next

पिंपरी : चिंचवड विधानसभा निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा ६० हजार २९७ मतांनी पराभव केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असूनही या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष डिपॉझिट वाचवू शकला नाही. काँग्रेस व मनसेचे उमेदवार अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फेकले गेले.
चिंचवड विधानसभेची निवडणूक उमेदवारीपासून मतदानापर्यंत विविध राजकीय घडामोडींनी लक्षवेधी ठरली होती. या मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात होते. प्रमुख पक्षांचे आठ व सोळा अपक्ष रिंगणात होते. त्यात भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नाना काटे, काँग्रेसचे कैलास कदम, मनसेचे अनंत कोऱ्हाळे, अपक्ष मोरेश्वर भोंडवे अशी लढत दिसून येत होती. मात्र, निकालावरून तिरंगी लढत झाल्याचे दिसून आले.
बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुलात मतमोजणी झाली. त्या वेळी केंद्राबाहेर तसेच क्रीडा संकुलाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. निवडणूक विभागाचे प्रतिनिधी, प्रमुख पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी सज्ज होते. पोलिंग एजंटमध्ये कमालीची उत्सुकता होती. कागद-पेन आणून केंद्रानुसार आकडेवारी लिहून घेण्याची उत्सुकता दिसून येत होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आमदार लक्ष्मण जगताप आघाडीवर होते. २४ व्या फेरीपर्यंत ते आघाडीवरच राहिले. सकाळी नऊला पहिल्या फेरीचा निकाल लागला. २ हजार १८८ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर सहाव्या फेरीत १२ हजार १२२ मतांची आघाडी, दहाव्या फेरीत १५ हजार १५७ मतांची आघाडी मिळाली. तेराव्या फेरीत हा आलेख खाली आला. जगतापांना १४ हजार ६१४ मतांची आघाडी मिळाली.
एकेका फेरीचा निकाल हाती येत असताना सर्वच भागातून मिळणारे मताधिक्य पाहून जगताप
समर्थकांचा उत्साह वाढत असल्याचे दिसून येत होते. तर शिवसेना,
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा एकेका फेरीनुसार उत्साह कमी होत चालला होता.
सोळाव्या फेरीत २४ हजारांची आघाडी मिळाली. विसाव्या फेरीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचे प्रतिनिधी आणि स्थानिक नेते एकेक करून गायब होऊ लागले, तर जगताप समर्थक एकमेकांना टाळ्या देऊन आनंद व्यक्त करीत होते. एकविसाव्या फेरीत ४४ हजार ६६७, पंचविसाव्या फेरीत ६० हजार १२१ ची आघाडी मिळाली. टपाली मतदान मोजले. ६८९ मतांपैकी जगताप यांना ३३५ मत आणि कलाटे यांना १५९ मते मिळाली. पोस्टल मतांत जगताप यांना १७६ मतांची आघाडी होती. पोस्टल मतांसह जगताप यांना ६० हजार २९७ची आघाडी मिळाली. दुपारी अडीचला मोजणीची शेवटची फेरी संपली. मात्र, अधिकृत निकाल तीनला जाहीर केला. दुपारी अडीचला निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी जगताप यांना प्रमाणपत्र दिले. कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. त्यानंतर आमदार जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी भाजपचे सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, नगरसेविका सीमा सावळे, सारंग कामतेकर, संजय जगताप, मोरेश्वर शेडगे, धनराज बिर्दा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's push for Chinchwad; Laxman jagatap jamgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.