काँग्रेसच्या उपोषणाला भाजपाचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:09 AM2018-04-10T01:09:15+5:302018-04-10T01:09:15+5:30

देशातील काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उपोषणाचे शस्त्र परजले आहे. काँग्रेसच्या जिल्हा व शहर शाखांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारला जातीयवाद रोखण्यात अपयश आले म्हणून राज्यस्तरावर उपोषण करण्यात आले

BJP's reply to the fasting of the Congress | काँग्रेसच्या उपोषणाला भाजपाचे प्रत्युत्तर

काँग्रेसच्या उपोषणाला भाजपाचे प्रत्युत्तर

Next

पुणे : देशातील काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उपोषणाचे शस्त्र परजले आहे. काँग्रेसच्या जिल्हा व शहर शाखांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारला जातीयवाद रोखण्यात अपयश आले म्हणून राज्यस्तरावर उपोषण करण्यात आले तर लोकसभा व राज्यसभा अधिवेशनाचे तास वाया घालवले म्हणून आता भाजपाचे देशभरातील सर्व खासदार त्यांच्या मतदारासंघात काँग्रेसच्या निषेधार्थ १२ एप्रिलला उपोषण करणार आहेत.
काँग्रेसच्या शहर शाखेने लोकमान्य टिळक चौकात एलआयसी बिल्डिंगसमोर सोमवारी एक दिवसाचे उपोषण केले. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासमवेत पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे तसेच पक्षाचे सर्व नगरसेवक, आघाडीप्रमुख उपोषणात सहभागी झाले होते. बागवे व अन्य वक्त्यांनी या वेळी भाजपावर टीका केली. केंद्र व राज्य सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले आहे. जातीयवाद रोखणे त्यांना शक्य झालेले नाही, उलट त्यांच्या
काळात त्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. कामगारहितविरोधी निर्णय घेण्यात येत असून, भांडवलदारांना मुभा देण्यात येत आहे, अशी टीका या वेळी वक्त्यांनी केली व दोन्ही सरकारांना सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दुसरीकडे भाजपाचे खासदार अनिल शिरोळे यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना, १२ एप्रिलचे एक दिवसाचे उपोषण जाहीर केले. पालकमंत्री गिरीश बापट हेही या वेळी उपस्थित होते. लोकसभा व राज्यसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात काँग्रेसने कामकाज होऊ दिले नाही. अधिवेशनाचे २४८ तास वाया घालवले. त्यांची ही भूमिका लोकशाहीविरोधी आहे. संसद ही कामासाठी असते. नीरव मोदी याच्यासारख्या पळपुट्या भांडवलदारांना वचक बसवणारे विधेयक अधिवेशनात संमत होणार होते, काँग्रेसच्या धोरणामुळे तो होऊ शकले नाही, अशी टीका खासदार शिरोळे यांनी केली.
लोकशाहीविरोधात काम करणाऱ्या काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी देशभरातील भाजपाचे सर्व खासदार त्यांच्या मतदारसंघात १२ एप्रिलला सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळात उपोषण करणार आहेत. पुण्यातील उपोषण बालगंधर्व चौकात होईल. पालकमंत्री बापट, महापौर मुक्ता टिळक, शहराध्यक्ष योगेश गोगावले व महापालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
>कष्टकºयांवर अन्याय
केंद्रातील व राज्यातील सत्ता जातीयवादाला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपा वापरत आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सर्व धर्मीयांना बरोबर घेऊनच काम केले पाहिजे. सत्ता कशी व कशासाठी राबवायची याबाबत त्यांच्यातच गोंधळ आहे व त्याचा परिणाम म्हणून सरकार गरीब, कष्टकरी कामगारांवर अन्याय करणारे निर्णय घेत आहे, त्याचा निषेध करणे गरजेचे असल्यानेच काँग्रेसने उपोषण करण्याचा निर्णय घेतला, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
भाजपानेही काँग्रेसच्या काळात संसदेचे कामकाज असेच रोखून धरले होते असे खासदार शिरोळे यांना विचारले असता, त्यांनी त्या वेळी काँग्रेसचा भ्रष्टाचार बाहेर येत होता व ते चर्चेला तयार होत नव्हते असे सांगितले. आता आम्ही चर्चेला तयार आहोत, पण ते चर्चा न करता कामकाज थांबवून धरत आहेत, त्यांचे हे वागणे लोकशाही विरोधी आहे व त्याची माहिती जनतेला व्हावी यासाठी निषेध करत असल्याचे शिरोळे म्हणाले.

Web Title: BJP's reply to the fasting of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.