Gram Panchayat Result Pune: दौंड तालुक्यात भाजपाचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:31 PM2022-12-20T14:31:02+5:302022-12-20T14:31:13+5:30
पाटेठाण, नांदूर, दहिटणे, देवकरवाडी, बोरीभडक, लोणारवाडी ठिकाणी भाजपा विजयी
केडगाव : दौंड तालुक्यामध्ये ८ पैकी ६ ग्रामपंचायत मध्ये भाजपने दणदणीत यश मिळवले आहे. आमदार राहुल कुल समर्थकांना ६ ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी १ ठिकाणी व काँग्रेस १ ठिकाणी विजयी झाले आहेत. पाटेठाण, नांदूर, दहिटणे, देवकरवाडी, बोरीभडक, लोणारवाडी ठिकाणी भाजपा विजयी झाला आहे.
पाटेठाण ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी असल्याने रिक्त राहिले असले तरी त्या ठिकाणी भाजपाची सत्ता आली आहे. तसेच नांदूर येथे युवराज बोराटे, दहीटणे आरती गायकवाड ,देवकरवाडी तृप्ती दिगंबर मगर,बोरीभडक कविता कोळपे व लोणारवाडी येथे प्रतीक्षा हिवरकर विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे यापैकी पाटेठाण ,नांदूर ,देवकरवाडी, बोरीभडक या ४ ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. या निवडणुकीमध्ये भाजपाने विजय मिळवल्याने सत्तांतर झाले आहे.
दापोडी येथे भाजपाचे बहुमत असले तरी थोरात समर्थक राष्ट्रवादीचे आबा गुळमे यांचा विजयी झाला आहे. येथे भाजपाचे ८ व राष्ट्रवादीचे ५ उमेदवार निवडून आले आहेत.डाळिंब येथे काँग्रेसचे बजरंग मस्के विजयी झाले आहेत. येथे राष्ट्रवादी व भाजपा पराभूत झाले आहे. या संदर्भात आमदार राहुल कुल म्हणाले की केंद्रात व राज्या मध्ये असणारे भाजपाचे शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या विचारांचा व विकास कामांचा हा विजय आहे.