रिपाइंला भाजपाची शिकवणी
By admin | Published: January 14, 2017 03:51 AM2017-01-14T03:51:08+5:302017-01-14T03:51:08+5:30
महापालिकेत युती, जागावाटप या सगळ्यासमोर प्रश्नचिन्ह असतानाही रिपब्लिनक पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)ने आपल्या
पुणे : महापालिकेत युती, जागावाटप या सगळ्यासमोर प्रश्नचिन्ह असतानाही रिपब्लिनक पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)ने आपल्या पक्षातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही लोकसभा निवडणुकीपासून भाजपा रिपाई समजोता असल्याचे सांगत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकायची कशी याचे खास धडे दिले.
भाजपाचे माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी रिपाईच्या इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण दिले. लोकसभेपासून रिपाई बरोबर भाजपाची युती असल्याचे स्मरणही त्यांनी करून दिले. मतदान केंद्र निहाय मतदारांच्या हजारी याद्या करणे, त्यावर एका कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे आदी गोष्टी कुलकर्णी यांनी रिपाई कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्या. मतदारांशी कशा प्रकारे संवाद साधायचा याचे प्रात्यक्षिकही त्यांनी काही उमेदवारांकडून करून घेतले. त्याचबरोबर उमेदवारांना प्रशिक्षित करून निवडणुकीच्या मैदानात उतरवणे ही भाजपाची अभिनव कल्पना राबविल्याबद्धल त्यांनी रिपाई शहर शाखेचे कौतूकही केले.
शहर शाखेचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, पक्षाचे पुणे व पिंपरी-चिंचवडचे निरिक्षक एम. डी. शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष महेश शिंदे, अशोक शिरोळे, मोहन जगताप , असित गांगुर्डे, अशोक कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. पक्षाचे पालिकेतील गटनेते, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्तविक केले व शिबिराची माहिती दिली. पक्षाकडून उमेदवारी अर्ज नेलेले सर्व इच्छुक या शिबिरात सहभागी झाले होते.
रिपाई व भाजपा यांची लोकसभा निवडणुकांपासून युती आहे. महापालिका निवडणुकीसाठी मात्र ही युती अद्याप चर्चेच्या स्तरावरही आलेली नाही. काही जागांची मागणी त्यांचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. रिपाईच्या उमेदवारांनी स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढवायची की भाजपाचे चिन्ह घ्यायचे यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली. काही रिपाई कार्यकर्ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल या मताचे आहेत, तर काहीजण भाजपाचे चिन्ह घेतले तर आपले मतदार मतदान करणार नाहीत अशी भिती व्यक्त करीत आहेत.