पुणे - महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपाचे योगेश मुळीक यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 02:08 PM2018-03-07T14:08:02+5:302018-03-07T14:08:02+5:30
योगेश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी दुधाने यांचा पराभव केला
पुणे - महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे योगेश मुळीक यांची निवड झाली. योगेश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी दुधाने यांचा पराभव केला. योगेश मुळीक यांना 10 तर लक्ष्मी दुधाने यांना 5 मते मिळाली. योगेश मुळीक भाजपाचेच वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू आहेत. स्थायी समितीत भाजपाचे 10 आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांचे 5 सदस्य आहेत.
शिवसेनेने मतदान न करता तटस्थ भूमिका बजावली. पिठासीन अधिकारी असलेले भूजल संवर्धन अधिकारी शेखर गायकवाड यांनी योगेश मुळीक यांना विजयी जाहीर केले. नगरसचिव सुनील पारखी यांनी गायकवाड यांना सहाय्य केले. महापौर मुक्ता टिळक तसेच मावळते अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यावेळी उपस्थित होते.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर योगेश मुळीक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भाजपाची भूमिका आहे. त्यातूनच मला न्याय मिळाला आहे. वाहतूक सुधारणा, घनकचरा व्यवस्थापनाला आपण प्राधान्य देणार आहोत'.