बारामतीत पुत्रप्राप्तीसाठी अघोरी जादुटोणा; उतारा पाहून सगळ्यांचीच उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 07:45 PM2020-05-25T19:45:18+5:302020-05-25T20:18:10+5:30
यापूर्वी इंदापुर,दौंड परिसरात पुत्रप्राप्तीसाठी इतरांची मुले बळी दिल्याचे प्रकार घडले आहेत...
बारामती: लॉकडाऊनच्या काळात बारामती तालुक्यात सध्या पुणे मुंबईहुन आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.त्यामुळे बारामतीकर धास्तावले आहेत.त्यातच तालुक्यातील झारगडवाडी येथील अघोरी उताऱ्याची चर्चा रंगली आहे. अंगावर काटा आणणारा उतारा पाहुन अनेकांची भंबेरी उडाली. पुत्रप्राप्तीसाठी जादूटोणा केल्यानंतर हा उतारा झारगडवाडी येथील कऱ्हा नदीकाठी टाकण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात सुचलेले हे विचित्र उद्योग पाहुन येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या उताऱ्यामध्ये उलट्या पंखाच्या चार कोंबड्यांसह कोहळ्याची चार फळे,काळ्याबाहुल्या,टाचण्या लावलेली २२ लिंबे, स्त्रीचे अर्धवट कापलेले केस,चारमासे,घोड्याच्या पायाची झिजलेली नाळ, लहान मुलांचे कपडे,चार काळे पीस यावस्तुंचा समावेश होता.संपुर्ण उतारा बांधलेल्या पोत्यात टाकण्यात आला होता.त्यामुळे यातील दोन कोंबड्यांचा श्वास गुदमरुन मृत्यु झाल्याचे दिसुन आले.
या उताऱ्यात शास्त्रीय दृष्ट्या काहीही अर्थ नसताना मोठा खर्च केल्याचे दिसुन येते. 'अंनिस' चे कार्यकर्ते या उताऱ्याची पाहणी करत असताना' कशाला त्याला हात लावताय , उगा दुसऱ्याची बिलामत तुमच्या मागं' असे म्हणत तिथून जाणाऱ्या वृद्ध महिलेने भीती घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,अंनिसचे बारामती कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी या प्रकाराची रुतुराज काळकुटे,किरण खरात यांच्यासमवेत पाहणी केली. याबाबत कार्याध्यक्ष पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले , झारगडवाडी गावातील स्मशानभूमीजवळ मोठ्या स्वरूपाचा उतारा ठेवण्यात आला होता.यामध्ये असणारे लहान बाळाचे कपडे पाहुन हा प्रकार पुत्रप्रात्तीसाठी केला असण्याची शक्यता आहे.हा उतारा केवळ लहान मुलांच्या कपड्यांमुळे गंंभीर वाटला. इतर वेळी या उताऱ्याकडे फारसे कोणी पाहिले नसते. लहान मुलांच्या कपड्यावरुन हा पुत्रप्राप्तीसाठी अघोरी प्रकार केला असण्याची शक्यता आहे. यापूर्वी इंदापुर,दौंड परिसरात पुत्रप्राप्तीसाठी इतरांची मुल बळी दिल्याचे प्रकार घडले आहेत. आजचा प्रकार गंभीर असण्याची शक्यता आहे.त्याला वेळीच अटकाव करणे आवश्यक आहे.अन्यथा यातुन गंभीर अघोरी प्रकार वाढण्याची भीती आहे. उतारा पडल्यावर पसरात भीतीचे वातावरण होते,तेथील रस्ता कोणी ओलांडला नसल्याची माहिती समजत आहे.या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.