बारामतीत बनावट रेमडेसिविरचा काळाबाजार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:12+5:302021-04-18T04:09:12+5:30

पोलिसांच्या सतर्कतेमुळे रॅकेटचा पर्दाफाश चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे रॅकेटचा पर्दाफाश चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या बारामती:रेमडेसिविरच्या तुटवड्याचा फायदा ...

Black market of fake remedivir in Baramati, | बारामतीत बनावट रेमडेसिविरचा काळाबाजार,

बारामतीत बनावट रेमडेसिविरचा काळाबाजार,

Next

पोलिसांच्या

सतर्कतेमुळे रॅकेटचा पर्दाफाश

चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांच्या

सतर्कतेमुळे रॅकेटचा पर्दाफाश

चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

बारामती:रेमडेसिविरच्या तुटवड्याचा फायदा उचलत मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमोल भरून ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. सापळा रचून बारामती येथील पेन्सिल चौकात शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री बारामती ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटवर झालेली ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.

बनावट रेमडेसिविर विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला देखील मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्यासह प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर), संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) यांना बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वेगाने संक्रमण होत आहे. अशा परिस्थितीत राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांसह नातलगांचा देखील जीव टांगणीला लागला आहे. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा उचलत रेमडेसिविरच्या काळ्याबाजाराला देखील प्रचंड उत आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरासह तालुक्यात देखील रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची खबर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यासाठी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत काळाबाजर करणाऱ्या आरोपींशी संपर्क साधण्यात आला. यावेळी आरोपीने ३५ हजार रूपयांना एक इंजेक्शन मिळेल. तुम्ही पेन्सिल चौकामध्ये या, असे सांगितले. यावेळी बारामती ग्रामीण पोलिसांनी पेन्सिल चौकात सापळा रचला. ठरल्यावेळेप्रमाणे रात्री साडेबाराच्या दरम्यान आरोपी प्रशांत घरत व शंकर भिसे पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच ४३, एमव्ही, ९६९६) मधून आलेल्या आरोपींची व खबऱ्याची भेट झाली. प्रसंगावधान दाखवत पोलिसांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेतले.

दरम्यान, कोविड सेंटरमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करीत असलेल्या अवघ्या २२ वर्षाचा संंदीप गायकवाड हा मोकळया झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून मुख्य सूत्रधार दिलीप गायकवाड याच्याकडे देत होता. या बदल्यात संदीपला १० ते १२ हजार रूपये दिले जात होते. सिरीजच्या साहाय्याने या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून अवघ्या दहा ते पंधरा रूपयात ही बनावट रेमडेसिविर तयार करून ३५ हजार रूपयांना एक या प्रमाणे काळयाबाजार विकले जात होते. तसेच रेमडेसिविरच्या मागणीसाठी कोणी संपर्क साधला तर इंजेक्शन पोहचवण्याची जबाबदारी प्रशांत घरत व शंकर भिसे यांच्यावर होती. आतापर्यंत या रॅकेटमध्ये चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी यामध्ये कोण सहभागी आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या रॅकेटच्या माध्यमातून नवीन माहिती समोर येणार आहे. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या वतीने बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याला २५ हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक महेश ढवाण, हवालदार आर. जे. जाधव, आर. एस. भोसले, डी. एन. दराडे, निखिल जाधव आदींनी सहभाग घेतला.

----------------------------------

बनावट रेमडेसिविर इंजेक्शनमुळे कोणत्या रुग्णाला अपाय झाला आहे का, किंवा कोणता रुग्ण दगावला गेला आहे का, याबाबत अजून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी नवीन माहिती समोर येईल तशी आरोपींंवर कलमे वाढत जाणार आहेत. नागरिकांनी देखील का‌‌ळ्याबाजारात मिळणारी कोणतीही औषधे खरेदी करू नयेत. त्यामुळ तुम्हाला आर्थिक झळ तर बसणारच आहे. त्याचप्रमाणे तुमच्या रुग्णाचा जीव देखील धोक्यात येणार आहे. मान्यताप्राप्त औषधालय, अथवा शासकीय रुग्णालयामधूनच औषधे घ्यावीत.

- नारायण शिरगावकर

उपविभागिय पोलीस अधिकारी बारामती

--------------------------------

फोटो ओळी : बारामती पोलिसांनी बनावट रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

१७०४२०२१-बारामती-०७

----------------------------

फोटो ओळी : आरोपींनी तयार केलेले बनावट रेमडेसिविर

१७०४२०२१-बारामती-०८

---------------------------

Web Title: Black market of fake remedivir in Baramati,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.