रेमडेसिविरचा काळबाजार; कोरोना उपचार केंद्रातील परिचारिकेसह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:56+5:302021-04-12T04:09:56+5:30
पुणे : शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना काळ्या बाजारात चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी एका खासगी रुग्णालयातील कोरोना ...
पुणे : शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना काळ्या बाजारात चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी एका खासगी रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रातील परिचारिकेसह एकाला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) ही कारवाई करण्यात आली.
पृथ्वीराज संदीप मुळीक (वय २२, रा. साईप्रसाद सोसायटी, दत्तनगर) आणि नीलिमा किसन घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडेकर या हिंजवडीतील एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करतात. एफडीएतील निरीक्षक अतिश सरकाळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री होत असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस नाईक गणेश ढगे, चेतन होळकर यांना मिळाली. कात्रज येथील दत्तनगर परिसरात एकजण जादा भावाने रेमडेसिविरची विक्री जादा भावाने करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुळीकला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. मुळीक दत्तनगरमधील साईप्रसाद कोविड सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली. त्याने हिंजवडीतील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणा-या घोडेकर या आपल्या मैत्रिणीकडून रेमडेसिविर इंजेक्शन घेतल्याची माहिती दिली. याप्रकरणी मुळीक आणि त्याची परिचारिका मैत्रीण यांच्याविरोधात औषध किंमत नियंत्रण, जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्याचे उल्लंघन, औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्याान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, मुजावर, नीलेश शिवतरे, धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, अतुल मेंगे, मॅगी जाधव, गणेश ढगे आदींनी ही कारवाई केली. औषध निरीक्षक विवेक खेडेकर आणि नीलेश खोसे यांनी या कारवाईसाठी सहाय्य केले.
दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख तसेच गुन्हे शाखेच्या दहा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. इंजेक्शनची जादा भावाने विक्री होत असल्यास त्वरित पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
----------------------------------