काळा पैसा बाहेर येण्यास मदत होणार
By admin | Published: November 9, 2016 02:54 AM2016-11-09T02:54:00+5:302016-11-09T02:54:00+5:30
एक हजार पाचशेच्या नोटा बंद करण्याचा धडाकेबाज निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होणार आहे.
एक हजार पाचशेच्या नोटा बंद करण्याचा धडाकेबाज निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होणार आहे. राजकारण, उद्योगक्षेत्र व बांधकाम व्यावसायिकांकडे साठलेला अमाप काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मोदी सरकारने घेतलेला निर्णय अतिशय स्वागतार्ह असून त्याचा देशातील काळा पैसा बाहेर येण्यासाठी मदत होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून अनेक अर्थतज्ञांची बाजारात असणारा मोठ्या चलनी नोटा बंद करा अशी मागणी होती. त्यामुळे आता घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आता लोकांकडे असणारे जास्तीचे चलन बँकेत जाऊ शकणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे काळा पैसा कमी होऊन हे पैसे चलनातून बाद होतील. यामध्ये राजकारण, बांधकाम, उद्योग अशा क्षेत्रातील व्यक्तींकडे असणारा पैसा बाद होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
- वसंतराव पटवर्धन,
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ
या निर्णयाने उद्या सकाळी सर्वत्र गोंधळ उडणार आहे़ पहाटे दुध वितरकांनी पाचशेच्या नोटा घ्यायच्या का असा प्रश्न पडणार आहे़ गॅस सिलेंडरचा भाव ४५० रुपये आहे़ सर्व लोक पाचशे रुपयांची नोट घेतात़ ती आम्ही घ्यायची की नाही़ आरटीजीएस केल्याशिवाय कंपनीतून सिलेंडरचा ट्रक बाहेर पडत नाही़ उद्या जर बँका बंद असतील, तर आम्ही आरटीजीएस करु शकणार नाही़ त्यामुळे सिलेंडरची गाडी येत नाही़ इतका मोठा धाडसी निर्णय आहे़ अनेकांकडे पैसे पडून आहेत, ते चलनात, उद्योगात आले तर गुंतवणुक वाढेल़
- विजय भावे, माजी अध्यक्ष,
अखिल भारतीय गॅस वितरक संघटना,महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा अतिशय उत्कृष्ट निर्णय आहे़ त्यामुळे काळा पैसा बाहेर येणार आहे़ हा दिर्घकाळाच्या दृष्टीने चांगला असला तरी पुढील दोन दिवस खूप मोठा गोंधळ उडणार आहे़ सामान्यांकडे जे पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आहेत़ ते आपल्या बँक खात्यात भरु शकतील़ सामान्यांना मात्र हे दोन दिवस खूप त्रासाचे जाणार आहे़ हॉस्पिटल, औषधे अशा अत्यावश्यक बाबींसाठी लोकांकडे १०० रुपयांच्या नोटा नसतील तर ते हे दोन दिवस कसे करणार हा मोठा प्रश्न आहे़ अर्थव्यवस्थेवर याचा लगेच फारसा परिणाम होणार नाही़ लोक आता सावध होतील़
- भूषण तोष्णिवाल,
चार्टड अकाऊंटंट
काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर पंतप्रधानांी केलेला हा सर्जीकल स्ट्राईक आहे. शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला यामुळे आळा बसेल. समाजातील गरीब- श्रीमंत विषमता दूर होण्यास हा निर्णय लाभदायक ठरणार आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यवहार सोपे होतील. सामान्य माणसाच्या विकासाला चालना देणारा हा निर्णय स्वागर्ताह आहे.
- डॉ. संजय चोरडिया,
अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट
स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहारांचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. कॅशफ्री इकॉनॉमीच्या दृष्टीने हे पाऊल असून भविष्यात प्लॅस्टीकमनीचा वापर वाढणार आहे. ज्यांचे उत्पन्न ज्ञात आहे, त्या मध्यमवर्गीयांना फार फरक पडणार नाही. परंतु, बॅँकींगची सवय नसणाऱ्या घटकांना याचा थोडासा त्रास होईल. अर्थव्यवस्थेवर याचा तत्कालिन परिणाम काय होईल, हे आगामी काळच ठरवेल.
- सौरभ गाडगीळ, सराफ व्यवसायिक
अप्रतिम पाऊल
सरकारचे हे अप्रतिम पाऊल आहे़ काळ्या पैशाला आटोक्यात आणण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे़ याअगोदर सरकारने काळा पैसा जाहीर करण्यासाठी योजना जाहीर केली होती़ त्यानंतर आता हे पुढीलचे पाऊल टाकले आहे़ थोडे दिवस गोंधळ होईल़ काळा पैसा बाहेर येणार असल्याने आता सर्व स्वच्छ होणार आहे़
- संजय दाते,
निवृत्त आयकर अधिकारी
सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येईल. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही काळ व्यापारी व नागरिकांना अडचणी निर्माण होतील. मात्र आम्ही व्यापारी पाचशे व एक हजाराच्या नोटा स्वीकारणार नाही.
- प्रवीण चोरबेले,
पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष
हा निर्णय जाहीर झाल्यानंतर अनेकांनी सोने खरेदी करण्यासाठी फोन केला. सोने खरेदीसाठी देखील नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र रात्री उशीरा कोणालाही सोने विक्री करण्यात आली नाही. जो पर्यंत बँका पाचशे-हजाराच्या नोटा स्वीकारणार आहेत, तो पर्यंत आम्ही देखील ग्राहकांकडून त्याचा स्वीकार करु.
- वास्तुपाल रांका, सराफी व्यावसायिक