सोशल मीडियावर ‘ब्लॅक आऊट’ : महिला अत्याचाराला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 09:07 PM2018-10-01T21:07:43+5:302018-10-01T21:11:53+5:30
तीन वर्षाची चिमुरडी असो, तरुणी असो, महिला की वृध्दा, कोणीच सध्याच्या जगात सुरक्षित नाही, हे वास्तव या घटनांतून अधोरेखित होत आहे. लैंगिक आणि घरगुती हिंसेविरुद्ध सोशल मीडियावर सोमवारी फेसबूकवरील प्रोफाईल फोटो ‘ब्लॅक आऊट’ केला.
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : स्त्री शिकली, प्रगती झाली! पण, खरंच तिची प्रगती झाली का? एकीकडे ‘ती’ विविध क्षेत्र पादाक्रांत करत असताना दुसरीकडे तिच्यावर होणा-या अत्याचाराच्या हेलावून टाकणा-या घटना दररोज घडतच आहेत. शासनाची उदासिनता...कायद्याच्या अंमलबजावणीचा अभाव...की समाजाची असंवेदनशीलता? अशा घटनांचा निषेध करायलाच हवा. सुरुवात तर करायलाच हवी...स्वत:पासून. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध म्हणून सोशल मीडियावर सोमवारी दिवसभर ‘ब्लॅक आऊट’ पहायला मिळाला. या कँपेनमध्ये अनेक नेटिझन्सनी उत्स्फुर्त सहभाग घेत फेसबूकवरील प्रोफाईल फोटो ‘ब्लॅक आऊट’ केला. लैंगिक आणि घरगुती हिंसेविरुद्ध हा ब्लॅक आउट पाळण्यात आला.
प्रगत म्हणवणाऱ्या एकविसाव्या शतकाचे दिंडोरे पिटले जात असताना स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि मानसिकता अजूनही बुरसटलेलीच आहे. दररोजचा प्रवास, आॅफिस, रस्ता, एवढेच काय घरातही स्त्रीला पावलोपावली लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण, निमशहरी, शहरी भागातील प्रत्येक स्तरातील स्त्रीला आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आलेला असतो. वर्तमानपत्र उघडले की महिलांवरील अत्याचाराच्या घटना मनाला चटका लावून जातात. तीन वर्षाची चिमुरडी असो, तरुणी असो, महिला की वृध्दा, कोणीच सध्याच्या जगात सुरक्षित नाही, हे वास्तव या घटनांतून अधोरेखित होत आहे. अत्याचाराच्या घटनांवर विविध माध्यमांतून टीका होत राहते. नराधमांना शिक्षा व्हावी, यासाठी कँडल मार्च, शासनाला विचारलेला जबाब, विविध माध्यमांतून व्यक्त झालेला संताप, याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर अनेक महिलांनी सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत आपला प्रोफाईल फोटो काढून टाकून त्याऐवजी काळा चौकोन निवडला. या जगात महिलांचे अस्तित्वच उरले नाही, तर काय होईल, याची कल्पना करावी, या उद्देशाने ‘ब्लॅक आऊट’ पाळण्यात आला.
ब्लॅक आऊटबाबत सोशल मिडियावर विविध प्रकारची मते नोंदवण्यात आली. केवळ प्रोफाईल फोटो काळा करुन परिस्थिती बदलणार आहे का, असा सवाल काहींनी उपस्थित केला. दुसरीकडे, निषेधाची सुरुवात आपल्यापासून करायला काय हरकत आहे, असा मतप्रवाहही यावेळी पहायला मिळाला. या कँपेनमध्ये केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. अनेकांनी या कँपेनबाबत ‘गूगल सर्च’ करुन अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
--------------
महिला अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराविरोधात सोशल मिडियावर ब्लॅक आऊट पाळण्यात आला. अनेकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेत फेसबूकवरील प्रोफाईल फोटो काळ्या रंगाचा चौैकोन ठेवला. प्रत्येक वेळी एखादे कँपने एखाद्या संस्थेने अथवा व्यक्तीने आवाहन केल्यावरच का पाळले जावे? स्वयंस्फुर्तीने निषेध नोंदवून आपल्यापासूनही सुरुवात करता येईल. यामध्ये केवळ महिलाच सहभागी झाल्या असे नव्हे, तर महिला अत्याचाराला विरोध करणा-या पुुरुषांनीही यामध्ये सहभाग घेतला.
-मुक्ता चैैतन्य, लेखिका
--------------------
महिला अत्याचाराच्या, घरगुती हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला कुठेच सुरक्षित नाहीत. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर या घटनांचा निषेध नोंदवायला हवा. सोशल मिडिया हे सध्याचे अभिव्यक्तीचे महत्वाचे व्यासपीठ बनले आहे. ‘ब्लॅक आउट’च्या माध्यमातून आम्ही सर्व मैैत्रिणींनी आमच्या स्तरावर निषेध नोंदवला. नेटिझन्सकडून या कँपेनला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
- शमिका जोशी