पुण्यात स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांचा काळ्या फिती लावून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:38 PM2021-05-24T16:38:43+5:302021-05-24T16:38:50+5:30
पुणे महापालिकेच्या खोट्या आश्वासनाने वेचक संतप्त
पुणे: कोरोनाच्या काळात स्वच्छ संस्थेच्या अंतर्गत असंख्य कचरा वेचक कार्यरत आहेत. ते स्वतःच्या जीवाची परवा न करता काम करत आहेत. त्यांच्या कोव्हिडं सुरक्षा साहित्य पुरवणे, आयुर्विमा काढणे, ढकलगाडी देणे, या मागण्या पूर्णत्वाकडे जात नाहीत. पुणे महापालिका फक्त याबाबत आश्वासन करत आहे. स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांनी या गोष्टीचा काळ्या फिती लावून निषेध दर्शवला आहे.
आम्ही आमचे काम शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत. पण पालिकेने मागण्यांचा विचार केला नाही. तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या सुरक्षेबाबत साहित्य पुरवण्याचे महापालिका ठरवत आहे. पण त्या गोष्टी कागदावरच राहिल्या आहेत. तसेच आयुर्विमा काढून देण्याचे नुसते जाहीर केले. प्रत्यक्षात अजूनही विमा काढून दिला नाही. असा आरोपही त्यांनी केला आहे.
शहरातील ३० लाखाहून नागरिक आणि ११५ नगरसेवकांचा लेखी पाठिंबा आमच्या कामाचे यश अधोरेखित करत नसेल. तर महापालिकेला कचरा व्यवस्थापनातून काय अपेक्षा आहेत हे आम्हाला समजत नाही. असे कचरा वेचक प्रतिनिधी नाईकनवरे यांनी सांगितले आहे.
कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडे सध्या ढकलगाडीही दिलेली नाही. महापालिकेने मान्य केलेला आयुर्विमा पीपीई किट, काम करण्याचे साहित्य यापैकी आमच्यापर्यंत काहीही पोहोचत नाही. आमच्या उपजीविकेच्या कंत्राटीकरणाबद्दलच्या चर्चांना वेग पाहून चीड येत आहे. तरीही आम्ही ना थांबता काम सुरू ठेवले आहे. याची जाणीव महापालिकेला आहे का. असा प्रश्न कचरा वेचक राणी शिवचरण यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांसोबत असलेली सामाजिक बांधिलकी जपत कचरा वेचक शहराच्या आरोग्यासाठी इथून पुढेही आपले काम थांबवणार नाहीत. जनतेच्या सेवेसाठी नेहमीच हजर राहतील. पण महापालिकेने आमच्या मागण्यांचा विचार करावा. अशी विनंती स्वच्छचे सदस्य आलोक गोगटे यांनी केली आहे.