वेल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवला काळा तांदूळ; जाणून घ्या आरोग्यवर्धक तांदळाचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 04:25 PM2022-01-06T16:25:17+5:302022-01-06T16:44:56+5:30

मार्गासनी ( पुणे ): वेल्हा तालुक्यातील पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला जास्त उत्पन्न देणाऱ्या भात पिकाच्या लागवडीची जोड देण्याच्या उद्देशाने ...

black rice grown by farmers in velha know health benefits of rice | वेल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवला काळा तांदूळ; जाणून घ्या आरोग्यवर्धक तांदळाचे फायदे

वेल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवला काळा तांदूळ; जाणून घ्या आरोग्यवर्धक तांदळाचे फायदे

googlenewsNext

मार्गासनी (पुणे): वेल्हा तालुक्यातील पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला जास्त उत्पन्न देणाऱ्या भात पिकाच्या लागवडीची जोड देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या काळा भात लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तोरणा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून तब्बल २० एकर क्षेत्रावर काळा भात लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर यांनी सांगितले. कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून व तोरणा ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने शेतकऱ्यांना काळा भाताच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती दिली व काळा भात लागवडीसाठी प्रेरित केले. काळ्या भाताचे कालीपत्ती व चाको हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. वेल्हा तालुक्यातील मौजे चिरमोडी, मार्गासनी, वांगणी, वांगणीवाडी, अडवली, अस्कवडी, वाजेघर आदी गावांमध्ये काळ्या भाताची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

काळ्या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोगदेखील टाळता येतो. शरीरातील चरबीचे प्रमाणदेखील कमी करता येते. असा हा बहुपयोगी औषधी काळा भात पिकवण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. साधारणपणे ११० ते १५० दिवसांत (वाणानुसार) या पिकाचे एकरी १३ ते १५ क्विंटल एवढे उत्पादन येते जे नियमित भातापेक्षा कमी आहे. मात्र या भाताला भाव नियमित भाताच्या दरापेक्षा चार ते पाच पट अधिक मिळतो. अशा या बहुपयोगी भाताचे उत्पन्न वेल्हा तालुक्यातील शेतकरी करू लागला आहे. कृषी क्षेत्रातील हा नावीन्यपूर्ण बदल येत्या काही दिवसांत नक्कीच परिवर्तनाचा भाग ठरेल.

हा काळा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम असल्याने देशांतर्गत तसेच विदेशी बाजारपेठेत अधिक मागणी आहे. साधारण २०० ते २५० रुपये प्रतिकिलो दराने याची विक्री होते. याचबरोबर या भाताच्या बियाणांची किंमतदेखील अधिक असून प्रतिकिलो बियाणे ३०० ते ४०० रुपये (वाणानुसार) एवढा दर आहे. वेल्हा तालुक्यात भात शेती ही तुकड्या-तुकड्यात केली जाते. वेल्ह्यात भात शेतीसाठी असणाऱ्या अल्प जागेमध्ये तेवढ्याच श्रमामध्ये काळा भात शेतीमधून शेतकऱ्यांना चार ते पाच पट अधिक उत्पन्न मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर काळ्या भाताची लागवड करावी, असे आवाहन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश अबदागिरे यांनी केले.

काळ्या भाताचे गुणधर्म -

१. जीवनसत्त्व बी व ईचे उत्तम स्रोत.

२. हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात राहतो.

३.ॲन्टिऑक्सिडेंटचा समावेश.

४. रोगप्रतिकार शक्ती वाढते.

५. पचनशक्ती सुधारते.

शेतकरी बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषी उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग व आत्मा अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा यासाठी विकेल ते पिकेल अभियानाच्या माध्यमातून विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.

-धनंजय कोंढाळकर

तालुका कृषी अधिकारी, वेल्हा

Web Title: black rice grown by farmers in velha know health benefits of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.