अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:15 AM2018-03-15T01:15:49+5:302018-03-15T01:15:49+5:30
‘अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आहे. वर्ष पूर्ण झाले, तरी ती गेलेली नाही. त्यामुळेच ते काळे वर्ष साजरे करीत आहेत,’ अशी टीका महापौर मुक्ता टिळक यांनी केली.
पुणे : ‘अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आहे. वर्ष पूर्ण झाले, तरी ती गेलेली नाही. त्यामुळेच ते काळे वर्ष साजरे करीत आहेत,’ अशी टीका महापौर मुक्ता टिळक यांनी केली. महापालिकेतील वर्षभराच्या सत्ताकाळात मागील पंधरा वर्षांत झाली नाहीत तेवढी मोठी व महत्त्वाची कामे झाली आहेत, असा दावा त्यांनी केला.
स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, महापालिकेत १५ मार्च २०१७ रोजी महापालिकेतील महापौर व अन्य सत्तापदे भारतीय जनता पार्टीने ग्रहण केली. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त महापालिकेत महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, मंजूषा नागपुरे आदी या वेळी
उपस्थित होते. सर्वच पदाधिकाऱ्यांनी वर्षभरातील विविध कामे सांगितली व गोगावले यांनी पक्षाचे वर्षभरातले काम उत्तम असल्याचे प्रमाणपत्र दिले.
महापौरांनी मेट्रो, २४ तास पाणी योजना, नदीकाठ संवर्धन योजना, नदीसुधार योजना आदीविषयी महापौरांनी सांगितले. मुरलीधर मोहोळ यांनी मिळकतकर देणाºया कुटुंबप्रमुखासाठीची अपघात विमा योजना, वैद्यकीय; तसेच परिचारिका महाविद्यालय या योजनांचा आढावा घेतला. सर्व मोठ्या योजनांचे काम सुरू असून, त्यातील काही पूर्णत्वाला येत असल्याचे ते म्हणाले.
भिमाले यांनी मिळकत कर विभागाचे उत्पन्न जीआयएस यंत्रणेमुळे वाढले असल्याचा दावा केला. कॅन्सरमुक्त पुणे, लहुजी वस्ताद स्मारक, शिवसृष्टी या योजनांची माहिती त्यांनी दिली. योगेश मुळीक यांनी आगामी वर्षात सर्व योजना पूर्ण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले.
>शिवसृष्टी बीडीपीत होणार आहे. त्याच नव्हे तर संपूर्ण शहराच्या बीडीपी धोरणाविषयी पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली आहे. आमदार, खासदार यांनाही त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात चर्चा होईल व नंतर मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती देण्यात येईल. या महत्त्वाच्या विषयावर त्यानंतरच निर्णय होईल, असे भिमाले यांनी सांगितले.
>वाहनतळ : धोरण प्रशासनाचे
शहराध्यक्ष गोगावले यांनी पक्षाचे काम महापालिकेत जाहीरनाम्यानुसार सुरू असल्याचे सांगितले. वाहनतळ धोरण प्रशासनाने आणले आहे, त्याला आम्ही अनेक सूचना केल्या आहे. दर वाढणार नाहीत, असा दिलासा त्यांनी दिला. दुमजली पार्किंगचा तसेच दुचाकींना सवलत देण्याचा पर्याय दिला आहे, असे ते म्हणाले.
पक्षाच्या अंमलबजावणी समितीने सुधारणा करून दिलेल्या योजनाच पदाधिकारी पुढे आणतात, त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन त्या मंजूर होतात. याच पद्धतीने आगामी ४ वर्षांत कामे सुरू राहतील, असे गोगावले यांनी सांगितले