बालकाला ब्लॅकमेल करून ७.५ लाख लुबाडले, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 04:01 AM2018-02-01T04:01:10+5:302018-02-01T04:01:14+5:30
घरातील पोटमाळ्यावरील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज गायब झाल्याचे दिसून आले़ त्याची चौकशी करीत असताना १३ वर्षांच्या मुलाचा सिगारेट पितानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़
पुणे : घरातील पोटमाळ्यावरील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज गायब झाल्याचे दिसून आले़ त्याची चौकशी करीत असताना १३ वर्षांच्या मुलाचा सिगारेट पितानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़
आदित्य मधुकर वांद्रे (वय १८, रा़ पोफळेवस्ती, बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे़ वांद्रे हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे़ त्याच्याबरोबरच दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे़ तसेच वांद्रे याच्याकडून सोने घेणारा सोनार रेवण शिलवंत (वय ४६, रा़ गंगानगर, फुरसुंगी) यालाही अटक केली आहे़ हा प्रकार १४ आॅक्टोबर २०१७ ते १८ जानेवारी २०१८ दरम्यान घडला आहे़
याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे़ त्यांना दोन मुले, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे़ मोठा मुलगा बारावीत असून,
धाकटा १३ वर्षांचा मुलगा ८वीत शिकत आहे़ १८ जानेवारी रोजी नातेवाइकांच्या येथे मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने फिर्यादीच्या पत्नीने आणि आईने पोटमाळ्यावरील कपाटात दागिने ठेवले होते. दागिने ठेवलेल्या कपाटात दागिन्यांचा शोध घेऊनही दागिने मिळाले नाही. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी घरातील सर्वांना याबाबत विचारणा केल्यानंतर छोटा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडू लागला. त्याला धीर देऊन त्याच्याकडे घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यामध्ये त्याने त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी व वांद्रेने त्याला सिगारेट पिण्यास शिकविले. सिगारेट पित असताना मोबाईलवर तिघांनी त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ घरच्यांना दाखविण्याची भीती दाखविली व पैशाची मागणी केली़ तसेच हा व्हिडिओ व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करण्याची धमकी दिली़ त्यामुळे या मुलाने घरातील लोकांना काही न सांगता कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख
रक्कम गुपचुप घेऊन वेळोवेळी या तिघांना दिली़
तीन महिन्यांनी या मुलाकडून त्यांनी ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लुबाडला़ या मुलाच्या वडिलांना जेव्हा कपाटातील दागिने व रोख रक्कम नसल्याचे दिसून आले, तेव्हा त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला़ बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत़
दिवाळीपासून होते लुटत''
या मुलाकडून या तिघांनी ७ लाख ५५ हजार रुपये हडप केले होते़ त्यामध्ये १ लाख ७५ हजारांचे ७ तोळ्यांचे सोन्याचे गंठण, पाच तोळ्यांचा १ लाख २५ हजार रुपयांचा राणीहार, ९ तोळे वजनाच्या प्रत्येकी ३ तोळ्यांच्या २ लाख २५ हजार रुपयांच्या तीन वेढण्या, ३७ हजार रुपयांची दीड तोळ्याची कर्णफुले, २५ हजारांची एक तोळ्याची खड्याची सोन्याची अंगठी, ३५ हजार रुपयांची एक किलोची चांदीची वीट आणि ८ हजार रुपये असा ऐवज या मुलाने मित्रांना दिला होता़ हा ऐवज वांद्रेने रेवण शिलवंत याला विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़