ब्लॅकमेलिंगने संसार उद्ध्वस्त : पत्नीच्यापाठोपाठ पतीचीही आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 02:41 AM2018-10-04T02:41:12+5:302018-10-04T02:41:43+5:30
विवाहितेच्या आई-वडील, काकाविरुद्ध गुन्हा
पुणे : ब्लॅकमेलिंगला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्यावर तिच्याच घरच्यांच्या तक्रारीनंतरच्या ब्लॅकमेलिंगमुळे पतीनेही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आंबेगाव परिसरात घडली. सागर शिळीमकर (वय ३२) असे या तरुणाचे नाव आहे. पूर्वीचे प्रेमसंबंध माहिती झाल्याने धमकावणाऱ्या दिराला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिराला अटक केली.
दरम्यान, विवाहितेच्या पालकांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याने तिच्या पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या जोडप्याने आंबेगाव येथील राजयोग सोसायटीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सागर शिळीमकर असे आत्महत्या करणाºयाचे नाव आहे. सागरच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेचे आई-वडील, काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की सागरची पत्नी गीतांजली व तिचा प्रियकर आयर्न राक्षे यांना सागरच्याच फ्लॅटमध्ये असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यावरून गीतांजलीने सागरशी भांडण करून २४ सप्टेंबरला आत्महत्या केली होती. त्यानंतर गीतांजलीची आई जयश्री पवार यांनी सागरचा दीर सुहास शिळीमकर याला तिच्या मृत्यूस जबाबदार ठरवले. शिवाय, गीतांजलीचे प्रेमसंबंध सर्वांना सांगेल, अशी धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, असा आरोपही त्यांनी केला होता़
यापूर्वीही गीतांजलीचे काका लक्ष्मण बर्डे यांनी असेच आरोप करून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याचा आरोप शिळीमकर कुटुंबीयांनी केला आहे. या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन देत जयश्री पवार यांनी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. या प्रकाराने त्रासलेल्या सागरने जेथे गीतांजलीने आत्महत्या केली होती, त्याच घरात २९ सप्टेंबरला गळफास घेतला.
दरम्यान, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी लक्ष्मण बर्डे आणि आर्यन राक्षे यांना अटक
केली आहे़ पोलीस उपनिरीक्षक खानविलकर अधिक तपास
करीत आहेत.
गीतांजली व सागर यांचा डिसेंबर २०१३ मध्ये विवाह झाला होता़ लग्नानंतर दोनच महिन्यांनी तिचा दीर सुहास याला गीतांजलीचे लग्नापूर्वी चाकणमधील एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. ती पतीबरोबर आंबेगाव खुर्द येथे राहत होती, तर तिचा दीर सुहास भोर तालुक्यातील वीरवाडी येथे राहतो. तो जाणीवपूर्वक पुण्यात येऊन गीतांजलीला लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना सांगेन, अशी धमकी देत होता. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत असे, या धमक्यांना कंटाळून गीतांजलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, अशी तक्रार तिची आई जयश्री पवार यांनी दिली होती़