Swargate Case: महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल; गाडेचा मोबाईल शोधणे पोलिसांसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:26 IST2025-03-07T10:25:00+5:302025-03-07T10:26:08+5:30
आरोपीने यापूर्वीदेखील असे प्रकार केल्याचे समोर आले असून, महिला-मुलींनी समोर येऊन गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

Swargate Case: महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल; गाडेचा मोबाईल शोधणे पोलिसांसमोर आव्हान
पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या ताब्यात घेण्यात आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश सोमवारी (दि. ३) दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने आरोपी गाडेला ताब्यात घेत, याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्याकडे याप्रकरणाचा तपास देण्यात आला असून, आरोपीचा मोबाइल शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपी दत्तात्रय याने त्याचा मोबाइल त्याच्या गुनाट या गावातील उसाच्या शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने यापूर्वीदेखील मोबाइलमध्ये महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे याप्रकरणी आरोपीचा मोबाइल जप्त करून त्याची तपासणे करणे गरजेचे आहे.
दत्तात्रय गाडे या नराधमाने मंगळवारी (दि. २५) सकाळी २६ वर्षीय पीडितेवर कंडक्टर असल्याचे सांगून स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेत बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी (दि. २८) पहाटे आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले होते. पुणे पोलिसांकडे आरोपीविरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आरोपीने यापूर्वीदेखील असे प्रकार केल्याचे समोर आले असून, पीडित महिला-मुलींनी समोर येऊन गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.