क्लीनिंगचे काम करताना स्फोट
By admin | Published: May 30, 2017 02:12 AM2017-05-30T02:12:04+5:302017-05-30T02:12:04+5:30
चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये असणाऱ्या कॉर्निंग कंपनीच्या जवळच्या चौकात एचपीसीएल गॅस वाहिनीच्या क्लीनिंगचे
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये असणाऱ्या कॉर्निंग कंपनीच्या जवळच्या चौकात एचपीसीएल गॅस वाहिनीच्या क्लीनिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक लहान मुलगा किरकोळ जखमी झाला. भर वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला अपघात झाला असला तरी सुदैवाने त्यात अन्य कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. यापेक्षा भयानक म्हणजे या ठिकाणी काम करणारे कामगार कुठल्याही सुरक्षा साधनाविना काम करीत होते. यावरून कामगारांची काम करण्याच्या ठिकाणची असुरक्षितता समोर येत आहे.
या याठिकाणी काम करणारे कामगारदेखील कुठल्याही सुरक्षेविना काम करीत असल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळाले. काम करणाऱ्या नागरिकांना ना हेल्मेट होते ना सुरक्षा जॅकेट. त्यामुळे औद्योगिक भागात कामगार किती धोकादायक परिस्थितीत काम करतात याचा अनुभव येतो.
आणि सर्वात धोकादायक म्हणजे या ठिकाणी खोदकाम करताना २२ केव्ही क्षमतेची वीज वाहिनी करणारी केबल यावेळी कट झाल्याने मोठा अपघात घडला नाही हे काम करणारांचे भाग्य ठरले.
वराळे गावच्या हद्दीत कॉर्निंग कंपनीच्या चौकात गॅसवाहिनीचे काम सुरू आहे. भांबोली गावाकडून ही गॅसवाहिनी आली आहे.
एचपीसील कंपनीच्या अंतर्गत आम्ही काम करीत आहे. आज क्लीनिंग करीत असताना पुशिंग करते वेळी ही घटना घडली आहे. परंतु यापुढे काम करताना आम्ही काळजी घेऊ.
- एस. वडीवेलन, अॅडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी
आज सकाळी या ठिकाणी गॅसवाहिनी क्लीनिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या झालेल्या स्फोटामुळे त्या ठिकाणी खोदकाम करून काढण्यात आलेल्या मुरूम, माती मोठ्या प्रमाणात
उडाली आणि आजूबाजूच्या परिसरात पसरली. धुळीचे लोटदेखील मोठ्या उंचावर उडाले होते.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की आजूबाजूच्या हॉटेलमध्ये देखील दगडाचे खडे आणि माती होती. या वेळी झालेल्या प्रचंड मोठ्या आवाजाने आणि स्फोटाच्या धक्क्याने जवळच्या हॉटेलमध्ये खेळत असणारा लहान मुलगा खाली कोसळला आणि यात किरकोळ जखमी झाला. उडालेले दगड या वेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांनादेखील लागले.