पुण्यात स्पा सेंटरच्या कारवाईचा धडाका; धानोरीत सुरु होता वेश्या व्यवसाय, मालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:08 IST2024-12-06T13:07:44+5:302024-12-06T13:08:34+5:30
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला एखाद्या ठिकाणी स्पाच्या आडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळते, मात्र स्थानिक पोलिसांना याबाबत थांगपत्ता देखील लागत नाही

पुण्यात स्पा सेंटरच्या कारवाईचा धडाका; धानोरीत सुरु होता वेश्या व्यवसाय, मालकावर गुन्हा दाखल
पुणे : धानोरीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली, तसेच स्पा सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक सूरज भरत शाहू (३०, रा. गुलविल स्क्वेअर मॉल, धानोरी जकात नाका, मूळ रा. वाशी, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक छाया जाधव यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, गुडविल स्क्वेअर मॉल, दुसरा मजला, शॉप नं. २१४ येथे अरोमोनिआ फॅमिली स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. तेव्हा स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. चौकशीत सूरज शाहू याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस आली. पाेलिसांच्या पथकाने स्पा सेंटरमधून २२ हजार ५०० रुपये, मोबाइल, ग्राहक नोंद वही, पवनकुमार हरिशंकर अगरवाल या नावाची ग्राहक नोंद व अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.
वर्षभरात केवळ ३३ गुन्हे..
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी वर्षभरात केवळ ३३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने २०, तर स्थानिक पोलिस ठाण्यांकडून १२ गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, शहरात ४०० पेक्षा अधिक स्पा सेंटर आहेत. त्यातील काही स्पा वगळता बहुतांश ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याची माहिती आहे. असे असले तरी पोलिसांची कारवाई त्या तुलनेत तोडकी असल्याचे दिसून येते.
स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या तक्रारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर पडताच, खडबडून जागे झालेल्या गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहेत. कोंढवा, बाणेर, आणि विश्रांतवाडी येथील वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या तीन स्पा सेंटरवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक पोलिसांनी या कारवाईचा मोठा धसका घेतला आहे. सर्व स्पा सेंटर चालकांना बोलावून गैर प्रकार बंद करण्याबाबत दम दिल्याची माहिती आहे.
स्थानिक पोलिसांना थांगपत्ताही लागत नाही
शहरात स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. त्यातील काही स्पा सेंटर नियमानुसार व्यवसाय करत असतील. मात्र यापैकी बहुतांश स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार चालत असल्याची माहिती आहे. असे असताना, आत्ताच्या तीन कारवाई सोडता पोलिसांनी वर्षभरात केवळ ३० स्पा सेंटरवरच गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये स्थानिक पोलिस ठाण्यांच्या कारवाईचा आकडा कमी आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस गैरप्रकार सुरू असलेल्या स्पा सेंटरवरील कारवाईबाबत उदासीनता असल्याचे निदर्शनास येते. त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला एखाद्या ठिकाणी स्पाच्या आडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र त्याचवेळी स्थानिक पोलिसांना याबाबत थांगपत्ता देखील लागत नाही हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखे आहे.