बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास
By Admin | Published: March 14, 2016 01:19 AM2016-03-14T01:19:02+5:302016-03-14T01:19:02+5:30
अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नसरापूर व परिसरातील नागरिकांना राजगड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बाजारपेठेत मोकळा श्वास घेता आला
नसरापूर : अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नसरापूर व परिसरातील नागरिकांना राजगड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बाजारपेठेत मोकळा श्वास घेता आला. सक्षम अधिकाऱ्याने मनात आणल्यानंतर काय बदल होऊ शकतो, याचा प्रत्यय आज नसरापूरकरांना आला. पोलिसांच्या या प्रयत्नाला आज कोंडी सोडविण्यात यश आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
नसरापूर बाजारपेठेत अनेक वर्षांपासून वाहतुकीची कोंडी व समस्या मोठ्या प्रमाणात आ वासून उभ्या आहेत. वाहतुकीची समस्या ग्रामस्थ व पोलिसांच्या माध्यमातून अनेक वेळा सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यात नेहमी अपयशच पदरात पडते.
शनिवारी (दि. १२ रोजी) नसरापूर बाजारपेठेतील व्यापारी, ग्रामस्थ व राजगड पोलीस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या वेळी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्याचे नवनियुक्तपोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, उपसरपंच सुमन घाटे, ग्रा.पं.सदस्य संदीप कदम, विक्रम कदम, आजी-माजी सरपंच, पदाधिकारी, व्यापारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच राजगड पोलीस नसरापूर बाजारपेठेत येऊन संबंधितांशी संवाद साधत अडथळे दूर करीत होते. नसरापूरकरांबरोबर झालेल्या बैठकीची अंमलबजावणी पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी केलेल्या आवाहनाला ताबडतोब प्रतिसाद देऊन नसरापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वत:हून अडथळे दूर केले; मात्र तरीही वाहतुकीची समस्या बेजबाबदार वाहनांमुळे सुटू शकली नाही. याकरिता संबंधित बैठकीचे आयोजन पोलिसांनी केल्याचे समजते.
(वार्ताहर)