अंध मुलांची सायकल सफर; पुणे ते गोवा अंतर पूर्ण केले अवघ्या ३१ तासांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:11 PM2017-11-13T12:11:37+5:302017-11-13T12:15:14+5:30
पुणे ते गोवा हे साडेसहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या एकतीस तासांत सायकलवर पूर्ण करत अॅडव्हेंचर बियॉण्ड बॅरियर्स फाऊंडेशन संस्थेच्या मुलांनी नियतीला सपशेल मात देत दिव्य यश संपादन केले.
पुणे : अंधपणा हा त्यांच्या आयुष्यात नियतीने टाकलेला एक डाव. नियतीच्या खेळासोबत उपेक्षांनी त्यांचे जगणे असहाय केले होते. तसेच त्यांच्यातला एक तर आश्चर्य म्हणजे धारावीतला गुंड म्हणून वावरत होता. परंतु पुणे ते गोवा हे साडेसहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या एकतीस तासांत सायकलवर पूर्ण करत अॅडव्हेंचर बियॉण्ड बॅरियर्स फाऊंडेशन संस्थेच्या मुलांनी नियतीला सपशेल मात देत दिव्य यश संपादन केले.
डेक्कन क्लिफ हँगर सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली स्पर्धा त्याचे निमित्त होते. या स्पर्धेतील स्पर्धा पुणे ते गोवा असे ६४५ किलोमीेटरचे अंतर केव़ळ ३२ तासांत सायकलवर पूर्ण करण्याचे आव्हान असते. अॅडव्हेंचर बियॉण्ड फाऊंडेशनने यशस्वी कामगिरी केली. या संस्थेतील एकीनाथ, मनस्वी बाहेती, दिव्यांशू गणात्रा, प्रसाद या दिव्यांगांचा समावेश केला. त्यांना कॅप्टन नुपूर पिट्टी, भरत पिट्टी, कैलास बाहेती, प्रवीण कुमार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. नुपूर पिट्टी म्हणाल्या, की उत्तम सायकलपटूदेखील या स्पर्धेत सहभाग नोंदविताना अनेकदा विचार करतात. कारण तसे हे आव्हान अशक्यप्राय आहे. ते पार करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि जिद्द आत्मविश्वास स्वत:सह संपूर्ण टीमच्या मनात निर्माण करणे गरजेचे होते. पण स्पर्धेत मिळविलेल्या अभूतपूर्व यशाने सर्व परिश्रमांचे सार्थक झाल्याची भावना मनात आहे.
एकीनाथ म्हणाले, की धारावीत गुंड म्हणून वावरत होतो. परंतु, अॅडव्हेंचर बियॉण्ड बॅरियर्समुळे माझ्या जीवनात स्वत:ला सिद्ध करण्याची एक संधी मिळाली. आणि या स्पर्धेतले यश मला प्रकाशाच्या वाटेवर घेऊन आले. यशाचे श्रेय नुपूर पिट्टी मॅडम व आमच्या संपूर्ण टीमचे आहे. स्पर्धेसाठी सर्व टीमने अतिशय प्रामााणिक मेहनत घेतली. यशानंतर लोक मला भेटले की थरारक अनुभवाबद्दल विषयी विचारत असतात. दिव्यांशू गणात्रा यांनी सांगितले, या स्पर्धेत जगभरातले सायकलपटू सहभाग नोंदवतात. खूप कमी लोकांना ते आव्हान पूर्ण करण्यात यश मिळते. प्रवासादरम्यान सायकल इंजिनिअर, डॉक्टर, सायकलिस्ट अशी पाच जणांची सुसज्ज यंत्रणा आमच्या सोबत होती.
अंध किंवा दिव्यांग मुलांना आयुष्यात खूप काही साध्य करायचे असते. त्यांच्याकडे विलक्षण जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वास असतो. परंतु समाज आणि कुटुंबाकडून त्यांच्यावर नेहमी अविश्वास दाखविला जातो. आमची संस्था मात्र कायम अशा गरुडझेप घेण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलांना प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
- नुपूर पिट्टी