दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे डोळस यश
By admin | Published: May 31, 2017 02:57 AM2017-05-31T02:57:36+5:302017-05-31T02:57:36+5:30
बारावीच्या परीक्षेसाठी कोणतेही शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसताना डोळस विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत निवांत संस्थेच्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बारावीच्या परीक्षेसाठी कोणतेही शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसताना डोळस विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत निवांत संस्थेच्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी डोळस यश मिळवले आहे. संस्थेतील १९ विद्यार्थ्यांनी कला शाखेत तर ५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
विश्रांतवाडी परिसरात टिंगरेनगर येथे निवांत ही संस्था गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अंध विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करते. अंधत्त्वामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निवांत संस्थेकडून आधार दिला जाते. त्यात काही अनाथ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीमध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या स्वत:च्या पायावर उभे रहावे लागते. निवांत संस्थेने अशाच निराधार विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
निवांत संस्थेच्या मीरा बडवे म्हणाल्या, कुटुंबाकडून व समाजातून कोणताही आधार न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना संस्थेने उभे केले आहे.
संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तयार केली आहेत. फर्ग्युसन, वाडिया, गरवारे यांसारख्या महाविद्यालयात संस्थेतील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला. त्यामुळे यंदाही बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
संस्थेमधील प्रियंका गायकवाड ८० टक्के, भाग्यश्री खंदादे ७८, अविनाश शिंदे ७२.६ ,मोनिका काळेले ७२.५, पांडुरंग जांबे ६८.५, जालिंदर मंगळवेढेकर ६८, अजय शिंदे ६७.२, योगेश घुटे ६६.८ यांनी यश मिळवले आहे. तसेच किरण सोलुंके, राजू दास, पवन नांगरे, अंकुश नांगरे, शुभांगी अंकूश, हुसेन शेख, भाग्यश्री पवार, प्रमोद शैलाले, अमोल माकर, सागर निकम, दत्ता ढोमरे यांनी कला शाखेत यश मिळवले आहे. तसेच प्रियंका केंद्रे ७६.६ टक्के, शंकर भोईटे ७१.१, अभिजित कसबे ७३.१, तेजस मते ७०.२ टक्के मिळवत वाणिज्य शाखेत यश मिळवले आहे. तसेच अनिकेत राऊत याने ६४.३ टक्के गुण प्राप्त केले.