हद्दीबाहेरील अंध व्यक्तींनाही पास
By admin | Published: August 5, 2015 03:05 AM2015-08-05T03:05:10+5:302015-08-05T03:05:10+5:30
महापालिका हद्दीबाहेरील अंध व्यक्तींनाही आता पीएमपीएमएलच्या प्रवासी पासचा लाभ मिळणार आहे. यासाठी प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या
पुणे : महापालिका हद्दीबाहेरील अंध व्यक्तींनाही आता पीएमपीएमएलच्या प्रवासी पासचा लाभ मिळणार आहे. यासाठी प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी सुमारे २८ लाख रुपयांचा खर्च महापालिकेकडून केला जाणार आहे. महापालिका हद्दीबाहेर जिथपर्यंत पीएमपी धावते त्या परिसरातील अंध व्यक्तींना याचा लाभ घेता येणार आहे. पीएमपीकडील माहितीनुसार, अशा सुमारे २०० व्यक्ती असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, या पाससाठी संबंधित व्यक्तीस २५ टक्के शुल्क भरावे लागणार असून, उर्वरित ७५ टक्के रक्कम महापालिका भरणार आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या माध्यमातून शहरातील अपंग व्यक्तींना पास दिले जात होते. तर पीएमपीकडून अंध व्यक्तींना पास दिले जात होते. या दोन्ही पासची रक्कम महापालिकेकडून कोणतीही चौकशी न करता अथवा किती पास दिले याची माहिती न घेताच पीएमपीकडून मागणी करण्यात येईल तेवढी रक्कम देण्यात येत होती. मात्र, नमके किती पास पीएमपी देते याची माहिती अनेक सदस्यांनी मागितली होती. पण, पीएमपीकडून सरसकट पास दिले जात असल्याने हा आकडा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या वर्षीपासून नागरवस्ती विभागाने अपंग तसेच अंध व्यक्तींचा पास याच विभागाने देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला होता.