आत्महत्या करायला निघालेल्या अंध विद्यार्थ्याला खाकी वर्दीच्या आड लपलेल्या ‘माणुसकी’चा प्रत्यय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:49 PM2019-01-29T13:49:00+5:302019-01-29T13:51:37+5:30
फेब्रुवारी महिन्यात परीक्षेला सुरुवात होणार असल्याने अद्याप रायटर न मिळाल्याने त्याला नैराश्य आले होते.
पुणे : आत्महत्या करायला निघालेल्या एका अंध तरुणाला परावृत्त करत त्याला बारावीच्या परीक्षेसाठी ‘लेखनिक’ शोधून देत करारीपणा आणि धाक यासाठी प्रसिद्ध असलेल्या पोलिसांच्या खाकी वर्दीच्या आत असलेल्या ‘माणुसकी ’ चे अनोेखे दर्शन घडविले. खडक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेली मदत, समुपदेशन आणि प्रेमळ वर्तणुकीमुळे या तरुणाचे कुटूंब भारावून गेले आहे.
अनिकेत राजेंद्र सिंगन (वय २०, रा. येवलेवाडी, कोंढवा रुग्णालयाजवळ, कोंढवा) हा तरुण १०० टक्के अंध आहे. त्याची आई आशा या एका कंपनीमध्ये मोलमजुरीची कामे करतात. त्याच्या वडीलांचे निधन झालेले आहे. त्याला दोन बहिणी असून एक बण बारावीमध्ये शिकते. ती हॉस्टेलवर राहात असून दुसरी बहिण आठवीमध्ये शिकते. हे कुटुंब मुळचे बार्शी तालुक्यातील आहे. मोठा असलेला अनिकेत मागील काही दिवसांपासून परीक्षेसाठी ‘रायटर’च्या (पेपर लिहून देणारे) शोधात होता. मात्र, त्याला रायटर मिळत नव्हता. फेब्रुवारी महिन्यात परीक्षेला सुरुवात होणार असल्याने अद्याप रायटर न मिळाल्याने त्याला नैराश्य आले होते. मुळातच हलाखीची परिस्थिती आणि त्यात आलेले नैराश्य यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.
तो १६ जानेवारी रोजी पं. नेहरु रस्त्यावरील सोनावणे रुग्णालयासमोर बस थांब्यावर उभा होता. दुपारी तीनच्या सुमारास तो वाहनांच्या तसेच बसच्या खाली जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. ही माहिती मिळताच लोहियानगर पोलीस चौकीचे हवालदार अंकुश मिसाळ, पोलीस नाईक तेजस पांडे आणि घाडगे हे तिघे घटनास्थळी गेले. त्यावेळीही अनिकेत वाहनांसमोर जात असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी तो फक्त मला मरायचे आहे; मला सोडा असे म्हणत होता.
पोलिसांनी त्याला चौकीमध्ये नेले. त्याला पाणी आणि चहा दिला. त्याच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केल्यावर त्याला रायटर मिळत नसल्याने नैराश्य आल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या आईशी फोनवरुन संपर्क साधला. दोघांचेही समुपदेशन केल्यावर होईल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याला विवेक जगदाळे नावाचा एक तरुण रायटर मिळाला. जगदाळे यांनी त्याची मदत करण्याची तयारी दर्शविली.
====
पोलीस नियंत्रण कक्षावरुन एक अंध तरुण आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळताच लोहियानगर पोलीस चौकीच्या पोलिसांनी तातडीने हालचाली करीत अनिकेतला ताब्यात घेतले. त्याचे समुपदेशन केले. त्याच्या आईशी संवाद साधला. आम्ही त्याची परिस्थिती आणि त्याची निकड यासंदर्भात छोटासा संदेश तयार करुन तो व्हॉट्सअॅप आणि सोशल मिडीयावर प्रसारीत केला. हा संदेश वाचून अनेक संवेदनशील नागरिक मदतीसाठी पुढे आले. आता त्याला रायटर मिळाला असून त्याची समस्या सुटली आहे. तो आता परिक्षेची तयारी करतोय हीच आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.
- राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ निरीक्षक, खडक पोलीस ठाणे
====
पोलिसांनी दाखवलेली माणुसकी आणि प्रेम यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत.आमची परिस्थिती हलाखीची आहे. माझ्या मुलाचे पोलिसांनी प्राण वाचवले. त्याची समजूत काढून त्याला रायटर मिळवून दिला. आता त्याची मनस्थिती चांगली आहे. आत्महत्येचा विचार त्याच्या मनामधून निघून गेला आहे. पोलीस अधूनमधून फोन करुन त्याची चौकशी करतात. यानिमित्ताने जगामध्ये गरिबांना अशा प्रकारे मदत करणारी संवेदनशील माणसेही आहेत याचा अनुभव आला.
- आशा सिंगन, अनिकेतची आई