कलंकशोभा!
By Admin | Published: February 15, 2017 12:50 AM2017-02-15T00:50:42+5:302017-02-15T00:50:42+5:30
आजकाल राजकारणात ‘पण लक्षात घेतो कोण?’ असा कुणी हरी नारायण आपटे यांच्या कादंबरीतील सनातन प्रश्न विचारला तरी कोणी लक्षात घेईलच, असे नाही.
आजकाल राजकारणात ‘पण लक्षात घेतो कोण?’ असा कुणी हरी नारायण आपटे यांच्या कादंबरीतील सनातन प्रश्न विचारला तरी कोणी लक्षात घेईलच, असे नाही. आचार, विचार आणि व्यवहाराच्या पातळीवर हल्लीचे राजकारण खूप पुढे गेले आहे. पुढे सरकणे हे प्रागतिक लक्षण मानले जात असले, तरी हे क्षेत्र त्यास अपवाद ठरावे. गेला बाजार राजकारण आणि तत्त्वाची केव्हाच फारकत झाली असल्याने कोणाकडे किती कलंकित आहेत, यावरून एखाद्या राजकीय पक्षाच्या चारित्र्याचा ‘लसावी’ न काढलेलाच बरा...
पूर्वी राजकारण ही सार्वत्रिक जीवनाची शेवटची पायरी असे. आता तीच ‘नामदेव पायरी’ झाल्याने सत्तेचा सोपान गाठणे सहज साध्य झाले आहे. आजवर सामाजिक कार्यातून तयार झालेले कार्यकर्ते राजकारणात येत. त्यामुळे त्यांच्याकडे किमान वैचारिक बैठक, स्वच्छ चारित्र्य आणि वादातीत पक्षनिष्ठा असायची. हल्ली आधी राजकारण आणि नंतर जमले तर समाजकार्य, असा उलटा प्रवास सुरू असल्याने कार्यकर्त्यांचा सामाजिक पिंड शेवटी कोरडा तो कोरडाच राहतो. वैचारिक धारणा आणि धोरणांचा दुष्काळ असल्याने असे राजकारण काळाच्या कसोटीवर टिकाव धरत नाही. मग अस्तित्वासाठी सुरू झालेला संघर्ष शेवटी लाचारीच्या पायरीवर येऊन ठेपतो. गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांची आज प्रकर्षाने आठवण होते. भारदेबुवांचे भाषण म्हणजे निरुपण असायचे. ‘संत महात्म्यांची वाट पुसत’ या ग्रंथात ते म्हणतात, ज्ञान असेल तरच भान येते. स्फूर्र्तींची मूर्ती होते आणि कार्यसिद्धी असेल तर आपोआप प्रसिद्धी मिळते. भारदेबुवा आज असते तर त्यांना हे उलटं लिहावं लागलं असतं. कारण हल्लीच्या राजकारणात ‘आधी प्रसिद्धी मग सिद्धी’ हा मूलमंत्र झाला आहे. राजकारणात ‘हरी’ राहिला नाही म्हणून ते ‘लहरी’ बनले आहे, असे निरीक्षणही भारदे एका ठिकाणी नोंदवितात. ‘हरी’ म्हणजे दीन, दलित, कष्टकरीवर्ग त्यांना अभिप्रेत होता. बाळासाहेब भारदे सलग वीस वर्षे राज्याचे सहकारमंत्री आणि दहा वर्षे विधानसभेचे अध्यक्ष होते. मंत्रिमंडळात घेतल्याची बातमी त्यांनी रेडिओवर ऐकली. शपथविधीसाठी ते एस.टी.ने मुंबईला निघाले. ही बातमी कळताच जिल्हाधिकाऱ्यांनी लाल दिव्याच्या गाडीने त्यांच्या एसटीचा पाठलाग केला. रस्त्यात गाडी अडविली. बाळासाहेबांना गाडीत बसण्याची विनंती केली. यावर ते म्हणाले, तुम्ही आणलेली लाल दिव्याची गाडी आणि एस.टी. दोन्ही वाहने सरकारीच. शिवाय, मी तिकीट काढलेले आहे. तेव्हा तुम्ही परत जा. मी एसटीने वेळेवर पोहोचतो!
तात्पर्य काय तर, काळाच्या ओघात भारदेबुवांसारखे निष्काम कर्मयोगी विसराळी पडले आणि हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानींसारखे कलंकित लोक राजकीय कुंडीतील शोभिवंत फुले बनली. सध्या अशा कलंकांचेच दिवस असल्याने कोणाकडे किती, असा हिशेब मांडायची गरज उरलेली नाही. सत्तेच्या हमामात सब नंगे असतील तर त्यांना गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली तरी ओघळांचे तीर्थ थोडेच होणार? या गणंगाकडे ‘इलेक्ट्रोल मेरिट’ं नावाचा अद्भुत असा चिराग असतो. तो घासला की, म्हणे हमखास विजय मिळतो! असे जादुई चिरागवाले अल्लाउदीन सगळ्यांनाच हवे असतात. त्यामुळे भाजपात शंकराचार्यांची जागा गुंडाचार्यांनी घेतली, असा आरोप ‘मातोश्री’वरून झाला असला तरी, त्यांनाही गुंडाचार्यांमध्ये ‘आचार्य’ दिसले, हे काय कमी आहे!
-नंदकिशोर पाटील