इंदापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:13+5:302021-05-20T04:11:13+5:30
-- इंदापूर : सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील तब्बल ६० गावांना शासनाने पाच टीएमसी पाणी ...
--
इंदापूर : सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील तब्बल ६० गावांना शासनाने पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी हा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या युवकांनी एकत्र येत इंदापूर महाविद्यालयासमोरील जुन्या पुणे-सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापुरातील साठ गावांसाठी देण्यासाठी दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेतला व तसा निर्णय मंत्र्याद्वारे करवून घेतला. त्यामुळे इंदापुरात भरणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला, तर दुसरीकडे सोलापुरात मात्र रोष वाढत राहिला. पाच टीएमसी पाणी सोलापूरच्या वाटेचे पळविले असल्याचा आरोप करत सोलापुरातील नागरिकांनी त्याला जोरदार विरोध केला. सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या भरणे यांच्या विरोधात सोलापुरातील नागरिकांनी उजनी धरणावर येऊन आंदोलन केले. अखेर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोलापुरात येऊन बैठक घेतली व इंदापुराला देण्यात येणारे पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला.
रद्द झालेल्या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील साठ गावांतील नागरिक व शेतकरी संतापले. त्यामुळे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांनी बुधवारी (दि. १९) निमगाव केतकी, बेलवाडी, हिंगणगाव, इंदापूर शहर व आपापल्या परिसरात शासनाच्या विरोधात आमच्या हक्काचे पाणी पाच टीएमसी आम्हाला मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत युवकांनी रास्ता रोको करून घोषणा दिल्या.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थी, युवक, शेतकरी युवक, युवा कार्यकर्ते यांनी इंदापूर शहरातील इंदापूर महाविद्यालयासमोरील जुना पुणे सोलापूर महामार्गावर ठिय्या मांडून काही काळ रास्ता रोको केला. या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन खामगळ, माजी कार्याध्यक्ष गणेश भोंग, इंदापूर राष्ट्रवादी सोशल मीडियाचे अध्यक्ष सागर पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सागर व्यवहारे, चांडगाव ग्रामपंचायती सरपंच देविदास आरडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रविराज साळुंखे, पृथ्वीराज मोहिते, अण्णा सलगर, सागर भोंग, अमोल बनकर, अनिकेत व्यवहारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
--
१९ इंदापूर राष्ट्रवादी रस्ता रोको
फोटो ओळी : इंदापूरात रस्ता रोको करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते