पुणे शहरात ४२ ठिकाणी नाकाबंदी; पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:44 PM2021-02-24T12:44:20+5:302021-02-24T12:44:40+5:30
एका दिवसात ९०२ जणांवर विनामास्क कारवाई
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची
संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शहर पोलीस दलाने ४२ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ६ वाजेदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर दिवसभर विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरु आहे.
शहरात २८ फेब्रुवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील नागरिक व कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात या ४२ नाकाबंदीच्या ठिकाणावर रस्त्यावरुन फिरणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. उशिरापर्यंत फिरण्याचे कारण जाणून घेतले जात आहे. कोणत्याही कारणाशिवाय फिरणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विनामास्क फिरणार्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस ठाणे व वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात ९०२ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. आतापर्यंत
पुणे शहरात २ लाख २८ हजार ५६० लोकांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११ कोटी ६ लाख ६ हजार ७०० रुपये दंड वसुल करण्यात आला
आहे.
जिल्ह्यात ७९३ नागरिकांवर कारवाई
पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी विनामास्क फिरणार्या ९७३ जणांवर कारवाई करुन १ लाख ९७ हजार ८०० रुपये दंड वसुल केला आहे. तर जिल्हा प्रशासनाने ९१३ जणांवर कारवाई करुन २ लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे