देहूगावात नाकाबंदीमुळे शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:35+5:302021-03-30T04:07:35+5:30
देहूगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बीजोत्सवास देहूगावात गर्दी होऊ नये म्हणून मंगळवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली ...
देहूगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बीजोत्सवास देहूगावात गर्दी होऊ नये म्हणून मंगळवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे देहूगावमध्ये सोमवारी शुकशुकाट दिसून आला. नदीचा घाटदेखील ओस पडलेला होता. विविध ठिकाणी बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाथा पारायण सोहळ्यांचे आयोजन केलेले असते. यंदा मात्र कोठेही अशा प्रकारचे सोहळ्याचे आयोजन केलेले दिसून आले नाही. त्यामुळे गावात हरिनामाचा गजर कोठेही ऐकू आला नाही.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी मंदिरात बीजोत्सवानिमित्त श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या कार्यालयात संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्तांसह चर्चा केली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक शाहिद पठाण उपस्थित होते.
तुकाराम बीजोत्सव श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने वैकुंठगमन मंदिर परिसरात केवळ ५० भाविकांमध्येच पारंपरिक पद्धतीने पार पाडला जाणार आहे. संस्थानच्यावतीने नित्यपूजापाठ व धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार असल्याची माहिती मधुकर महाराज मोरे यांनी दिली. मंदिरात ज्या ५० लोकांना पासेस दिले असून या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. बीजोत्सव देशभरातील भाविकांना पाहता यावा यासाठी संस्थानच्यावतीने संस्थानचे अधिकृत श्री संत तुकाराम महाराज फेसबुक लाईव्ह पेज, फेसबुक दिंडी या पेजवर व युट्यूबवर प्रक्षेपण करणार आहे.