अजमेरा कॉलनी भागात पोलिसांची नाकाबंदी
By admin | Published: May 9, 2015 03:16 AM2015-05-09T03:16:39+5:302015-05-09T03:16:39+5:30
कायदा, सुयव्यस्था अबाधित राखली जावी, या उद्देशाने नवे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी वारंवार पोलिसांनी नाकाबंदी करावी, सजगता दाखवावी,
पिंपरी : कायदा, सुयव्यस्था अबाधित राखली जावी, या उद्देशाने नवे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी वारंवार पोलिसांनी नाकाबंदी करावी, सजगता दाखवावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये विविध भागांत पोलीस महिन्यातून एक-दोन वेळा नाकाबंदी करू लागले आहेत. अजमेरा कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत नाकाबंदी करण्यात आली. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासण्यात आली. दुचाकीवाल्यांचीही कागदपत्रे तपासणी झाली.
नव्याने आलेल्या आयुक्तांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दिलेल्या पहिल्याच भेटीत वेळोवेळी पोलिसांनी नाकाबंदी करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी आयुक्तांच्या आदेशाला अधीन राहून नाकाबंदीला महत्त्व दिले आहे. वेळोवेळी होणाऱ्या नाकाबंदीमुळे नागरिकांमध्येही कायदा, सुव्यवस्थेबद्दल जागरुकता येऊ लागली आहे. कोणत्याही क्षणी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी होऊ शकते, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार सोबत गाडीची कागदपत्रे ठेवत आहेत. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. शहरातील अनेक भागांत नाकाबंदीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सध्या शहरामध्ये घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. तसेच सोनसाखळी चोरीच्याही
घटनांमध्ये वाढ होत आहे. त्या रोखण्यासाठी पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत आहे. तरीही
परिसरामध्ये चोरीच्या घटना कमी होत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)